विदर्भ, मराठवाडय़ासह पाच दिवस राज्यात वादळी पावसाचा अंदाज

बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे राज्यात बाष्पयुक्त ढगांची निर्मिती झाली आहे. त्यामुळे राज्याच्या बहुतांश भागांत शुक्रवार २१ सप्टेंबरपासून पुढील चार ते पाच दिवस मुसळधार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

शुक्रवारी मध्य महाराष्ट्रासह मराठवाडय़ात वादळी पाऊस पडेल, असा या विभागाचा अंदाज असून त्यामुळे मराठवाडय़ात गुरुवारीच आनंदाचे वातावरण होते.

अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून कमी दाबाचे क्षेत्र नाहीसे झाल्यानंतर मागील तीन आठवडय़ांपासून तुरळक ठिकाणी काही सरी वगळता संपूर्ण राज्यामध्ये पावसाने विश्रांती घेतली होती. त्यामुळे राज्यातील कमाल तापमानामध्ये चांगलीच वाढ झाली होती. बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा ३० ते ३५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेला होता. हिमाचल प्रदेश, मेघालय, राजस्थान आदी भागांत सक्रिय असलेल्या मोसमी पावसाच्या परतीच्या प्रवासाचे संकेत मिळाल्यानंतर दुसरीकडे बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्यास सुरुवात झाली होती. परिणामी मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मागील दोन दिवसांपासून पावसाच्या काही सरी कोसळल्या. कमी दाबाचे क्षेत्र तीव्र होऊन राज्याच्या बहुतांश भागात २१ सप्टेंबरनंतर पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली होती. त्यानुसार सध्या परिस्थितीत बदल होत असून, पाऊस राज्यात पुन्हा सक्रिय होण्याची चिन्हे आहेत. सोमवार २४ सप्टेंबरला संपूर्ण राज्यामध्ये पाऊस पडेल, असा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.

दिलासादायक!

मराठवाडय़ातील बहुतांश धरणातील पाणीसाठा तळाला गेला आहे. जायकवाडीवगळता अन्य धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा नाही. खरीप पिके धोक्यात आहेत. कापसावर बोंडअळी, सोयाबीनवर कीड पडल्याने उत्पादन घटणार आहे. दुष्काळाचेही सावट आहेच. त्यामुळे हवामान विभागाचा अतिवृष्टीचा इशारा  मराठवाडय़ातील जनतेला दिलासादायक वाटत आहे.

नदीकाठच्या गावांना इशारा

अतिवृष्टीने नदी-नाल्यांना पूर येऊन काही गावांचा संपर्कही तुटू शकतो. म्हणून नदी-नाल्यांच्या काठी राहणाऱ्या लोकांनी सावध राहावे, असा इशारा राज्य सरकारने दिला आहे.