ढगाळ वातावरणामुळे उकाडय़ात वाढ

कोकणामध्ये चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाल्याने पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे रविवारी कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला. मराठवाडय़ात हलक्या सरी बरसल्या. राज्यभर सध्या ढगाळ वातावरण राहत असल्याने उकाडय़ात वाढ झाली आहे. पुढील दोन ते तीन दिवस मध्य महाराष्ट्र, कोकण विभागात दुपारनंतर मेघगर्जनेसह पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

राज्यामध्ये मागील चोवीस तासांमध्ये महाबळेश्वर, नाशिक, सातारा, बुलढाणा येथे पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. पुढील दोन ते तीन दिवस बहुतांश ठिकाणी आकाश ढगाळ राहणार आहे. मुंबई आणि परिसरामध्येही आकाश अंशत: ढगाळ राहून काही भागात हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. निरभ्र आकाशामुळे मागील आठवडय़ामध्ये कोकण, मुंबई परिसर वगळता राज्यात इतर ठिकाणी किमान तापमानात मोठय़ा प्रमाणावर घट झाली होती. त्यामुळे रात्री चांगलीच थंडी जाणवत होती. मात्र, ढगाळ वातावरण निर्माण होताच थंडी गायब होऊन उकाडय़ात वाढ झाली आहे. महाबळेश्वर आणि नागपूर वगळता राज्यात जवळपास सर्वच ठिकाणी किमान तापमान २० अंशांच्या पुढे गेले आहे. कमाल तापमानही ३४ ते ३६ अंशांच्या आसपास आहे. ढगाळ स्थिती दूर झाल्यास उकाडा कमी होऊ शकणार आहे.

वीज पडून दोघांचा मृत्यू

पुणे जिल्ह्यतील मावळ तालुक्यामधील नेसावे येथे रविवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास वीज कोसळून दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. शोभा अंकुश शिरसठ (वय ३०), खंडू धोंडू शिरसठ (वय ५० दोघे रा. नेसावे, ता. वडगाव मावळ) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. संध्याकाळी या भागात पाऊस सुरू झाला. त्या वेळी ते  दोघे शेतात काम करीत असताना अंगावर वीज कोसळून त्यांचा मृत्यू झाला.