20 November 2019

News Flash

आनंदघनांची आनंदवार्ता!

मोसमी पाऊस अंदमानात दाखल

मोसमी पाऊस अंदमानात दाखल

तीव्र उष्म्यामुळे हैराण झालेले नागरिक आणि दुष्काळाच्या झळांनी होरपळलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देणारी आनंदघनांची आनंदवार्ता आली आहे. नैर्ऋत्य मोसमी वारे (मान्सून) शनिवारी (१८ मे) अंदमानात दाखल झाले. मोसमी पाऊस ६ जूनला केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज आहे.

पोषक स्थिती निर्माण झाल्याने १८ मे रोजी मान्सून अंदमानात दाखल होईल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला होता. तो खरा ठरला आहे. अंदमानात दाखल झालेल्या मान्सूनने संपूर्ण दक्षिण अंदमान समुद्र आणि निकोबार बेटे त्याचप्रमाणे बंगालच्या उपसागराचा काही भाग व्यापला असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. पोषक स्थिती असल्याने पुढील तीन दिवसांत त्याची आणखी प्रगती होणार आहे.

पावसाच्या आगमनाबाबत १५ मे रोजी वर्तवलेल्या अंदाजानुसार तो केरळमध्ये ६ जून रोजी म्हणजेच नियोजित वेळेपेक्षा सहा दिवस उशिराने दाखल होईल. मात्र, त्यात चार दिवसांची अनिश्चितता असते. त्यानुसार पाऊस २ ते १० जून या कालावधीतही केरळमध्ये येऊ शकेल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

मोसमी पावसाच्या नियोजित वेळेनुसार तो २० मेपर्यंत अंदमान समुद्रात, तर १ जूनला केरळमध्ये दाखल होतो. त्याचे केरळमधील आगमन देशातील आगमन ठरते. त्यानंतर जूनच्या १० ते १२ तारखेपर्यंत तो महाराष्ट्रात पोहोचतो आणि जुलै १५ पर्यंत संपूर्ण देश व्यापून टाकतो. यंदा त्यात काही दिवसांचाच विलंब होण्याची शक्यता पूर्वीच व्यक्त करण्यात आली आहे.

यंदा समाधानकारक पाऊस

  • मोसमी पाऊस अंदमानात दाखल झाल्यामुळे आता पुन्हा तो किती प्रमाणात पडेल, हा विषयही चर्चेत आला आहे.
  • सध्या महाराष्ट्राच्या अनेक भागांत दुष्काळी स्थिती आहे. अनेक ठिकाणी पाण्याचे साठे कोरडे पडले आहेत.
  • पाऊस समाधानकारक असेल, असा अंदाज हवामान विभागाने यापूर्वीच वर्तवला आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरीच्या ९६ टक्के पाऊस होईल.
  • भारतातील पावसावर परिणाम करणारा प्रशांत सागरातील ‘एल निनो’ हा घटक सध्या कमजोर पडला आहे.
  • पावसाच्या प्रगतीच्या काळात तो आणखी कमजोर होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्याचप्रमाणे ९६ टक्के पाऊस म्हणजे सरासरीइतकाच पाऊस असल्याचे हवामान अभ्यासकांचे मत आहे.

पावसाच्या आगमनाचे पूर्वानुमान

मान्सूनच्या केरळमधील आगमनाचे भाकीत भारतीय हवामानशास्त्र विभाग २००५ पासून वर्तवीत आहे. त्यासाठी सहा महत्त्वाचे घटक विचारात घेतले जातात. वायव्य भारतातील किमान तापमान, दक्षिण द्वीपकल्पावरील पूर्वमोसमी पावसाची स्थिती, दक्षिण चीन समुद्रातून आणि नैर्ऋत्य प्रशांत महासागरातून वातावरणात परावर्तित होणारा किरणोत्सर्ग, आग्नेय हिंद महासागरातील हवेच्या खालच्या थरात वाहणारे वारे, पूर्व विषुववृत्तीय हिंदू महासागरातील हवेच्या वरच्या थरात वाहणारे वारे आदी घटकांचा त्यात समावेश असतो.

First Published on May 19, 2019 12:18 am

Web Title: monsoon in maharashtra 31
Just Now!
X