नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी रविवारी राज्याचा ८० टक्के भाग व्यापून दुष्काळी स्थिती असलेल्या भागात प्रवेश केला. मराठवाडा आणि विदर्भात पावसाच्या सरी कोसळत असल्याने दिलासा मिळाला आहे.

येत्या ४८ तासांत संपूर्ण राज्यात मोसमी वारे दाखल होणार असून, राज्यात सर्वत्र कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, नगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्याच्या पूर्व आणि मध्य भागात ढगफुटी होऊन चारशे घरे आणि जनावरे वाहून गेली. तीन तासांत तब्बल १३० मि.मी. पावसाची नोंद झाली.

दोन आठवडे उशिराने प्रवास करणाऱ्या आणि १९ जूनपर्यंत केरळ, कर्नाटकपर्यंतच रेंगाळलेल्या मोसमी वाऱ्यांनी २० जूनपासून वेगाने प्रगती केली आहे. २० जूनला कोकणातून राज्यात प्रवेश करून तीनच दिवसांत राज्याच्या ८० टक्के भागात मोसमी वारे दाखल झाले आहेत. त्याबरोबर अनेक ठिकाणी मोसमी पाऊस हजेरीही लावतो आहे. सद्य:स्थितीत मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भाच्या बहुतांश भागात मोसमी वाऱ्यांनी प्रवेश केला आहे. नगर, औरंगाबाद, नागपूर आदी शहरांतही मोसमी वारे दाखल झाले आहेत. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार दोन दिवसांमध्ये मोसमी वारे संपूर्ण राज्य व्यापणार आहेत. मुंबई, पुणे, नाशिक आदी शहरांतही या कालावधीत मोसमी वारे पोहोचणार आहेत.

शनिवारी रात्री आणि रविवारी मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली. सोलापूर, औरंगाबाद, सांगली, नगर, नागपूर, उस्मानाबाद, सातारा, रत्नागिरी आदी भागात जोरदार पावसाने हजेरी लावली. नगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात ढगफुटी झाली. घरे आणि फळबागांचे प्रचंड नुकसान झाले. तालुक्याच्या पूर्व आणि मध्य भागाच्या पट्टय़ातील ब्राह्मणगांव, टाकळी, धारणगांव, म्हसोबावाडी, निमगांव, पारेगांव भागात शनिवारी रात्री साडेनऊ वाजेच्या दरम्यान तीन तास मुसळधार पाऊस झाला. तब्बल १३० मि.मी. पावसाची नोंद झाली. अनेकांच्या शेतात पाणी शिरले, फळबागा वाहून गेल्या.

पावसाचा अंदाज काय?

  • मोसमी वारे दोन दिवसांत राज्य व्यापणार आहे. सध्या बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढली आहे.
  • त्यासह दक्षिण महाराष्ट्र ते केरळ किनारपट्टीदरम्यान कमी दाबाचा समांतर पट्टा निर्माण झाला आहे. या स्थितीमुळे पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे.
  • परिणामी विदर्भ, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि तळ कोकणात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्याचप्रमाणे उर्वरित राज्यात २७ जूनपर्यंत विविध ठिकाणी पाऊस हजेरी लावणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.