दोन दिवसांत केरळमध्ये आगमन होण्याचा हवामान विभागाचा अंदाज

अरबी समुद्रातील मेकुणू चक्रीवादळ पूर्णपणे क्षीण होऊन त्याचे रूपांतर कमी दाबाच्या क्षेत्रात झाले आहे. त्यामुळे नैर्ऋत्य मोसमी पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. कमी दाबाचे क्षेत्र पूर्व अरबी समुद्र आणि केरळ, कर्नाटक किनारपट्टीजवळ आहे. त्यामुळे मंगळवापर्यंत मोसमी पाऊस केरळमधून देशात प्रवेश करेल. त्यानंतर ७ ते १० जूनपर्यंत त्याचे राज्यात आगमन होईल, असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

मोसमी पाऊस पुढील ४८ तासांमध्ये केरळचा काही भाग, दक्षिण अरबी समुद्र, मालदीव, कोमोरिन, तामिळनाडूचा काही भाग व्यापणार आहे. त्यानंतर त्याचा देशातील प्रवास सुरू होईल. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार सोमवारी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार आहे. केरळ किनाऱ्यालगत अरबी समुद्रात २.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहात आहेत. त्यामुळे लक्षद्वीप बेटे, केरळ, कर्नाटक किनाऱ्यावर दाट ढगांचे आच्छादन तयार झाले असून, या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मोसमी पावसाने २५ मे रोजी अंदमानात प्रवेश करून आनंदवार्ता दिली आहे. त्याच्या वाटचालीस सध्या पोषक वातावरण निर्माण होत असल्याने रविवारी (२७ मे) अंदमान- निकोबार बेटांसह बंगालचा उपसागर आणि दक्षिण अरबी समुद्राच्या काही भागात मोसमी पाऊस दाखल झाला आहे. नियमित वेळेच्या सुमारे पाच दिवस उशिराने अंदमानात आलेल्या मोसमी पावसाची पुढील वाटचाल मात्र काहीशी वेगाने होणार असल्याची चिन्हे आहेत. केरळमधील आगमनानंतर  ७ ते १० जूनच्या दरम्यान राज्यात त्याचे आगमन होण्याची शक्यता आहे.

विदर्भ अजूनही तापलेलाच

विदर्भात रविवारीही उष्णतेची लाट कायम होती. बहुतांश शहरांचे कमाल तापमान ४२ अंशांच्या पुढे नोंदविले गेले. पुढील दोन ते तीन दिवसांत विदर्भ, मराठवाडय़ात तुरळक ठिकाणी दुपारनंतर मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.