कोकण विभागात मुसळधार, इतरत्र हलक्या सरींचा अंदाज

किनारपट्टीवर कर्नाटकपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र कार्यरत असल्याने कोकण विभागामध्ये पाऊस हजेरी लावत असला, तरी उर्वरित राज्यात मात्र त्याने तूर्त उघडीप दिली आहे. प्रामुख्याने मराठवाडा आणि विदर्भाला जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. मध्य महाराष्ट्रातही सध्या पावसाची विश्रांती आहे. पुढील चार दिवस कोकण विभागामध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज असून, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणीच पावसाची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, काहीशा विश्रांतीनंतर राज्यात पाऊस पुन्हा जोर धरू शकणार आहे.

जुलैच्या दुसऱ्या आठवडय़ाच्या सुरुवातीला राज्यात बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस झाला. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण अधिक होते. मराठवाडा आणि विदर्भातही बहुतांश ठिकाणी पावसाने हजेरी लावली होती. या काळामध्ये धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्येही पावसाच्या जोरदार सरी बरसल्याने बहुतांश धरणांमध्ये मोठय़ा प्रमाणावर पाणीसाठा जमा होऊ शकला.

गेल्या तीन ते चार दिवसांपासून पोषक स्थिती नसल्याने मोसमी पाऊस कमजोर झाला आहे. त्यामुळे कोकण वगळता इतरत्र तुरळक ठिकाणीच हलक्या सरी पडत आहेत. सध्या मोसमी पावसाने देशाच्या ईशान्य पूर्व, उत्तर आणि दक्षिणेकडील भागात जोर धरला आहे. या भागात पुढील पाच दिवस चांगला पाऊस होणार आहे.

रविवारी (१४ जुलै) कोकण विभागातील अलिबागमध्ये चांगला पाऊस झाला. मुंबई, सांताक्रुझ तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, महाबळेश्वर, सांगली, सातारा आदी ठिकाणी अल्पशा पावसाची नोंद झाली. मराठवाडा आणि विदर्भामध्ये पावसाची नोंद झाली नाही. पुढील चार दिवसांमध्ये घाटमाथ्यावर काही ठिकाणी पाऊस पडणार आहे. या कालावधीत मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात मोठा पाऊस होणार नाही.

तापमानाचा पारा वाढला

राज्यात बहुतांश ठिकाणी सध्या पावसाने उघडीप घेतली असल्याने दुपारी ऊन चटके देऊ लागले आहे. कोकण विभाग वगळता राज्यात सर्वच ठिकाणी कमाल तापमानाचा पारा सरासरीच्या पुढे गेला आहे. प्रामुख्याने विदर्भामध्ये ३६ ते ३७ अंश सेल्सिअसवर किमान तापमान असून, सरासरीच्या तुलनेत ५ ते ६ अंशांनी अधिक आहे. मराठवाडय़ातही तापमानाचा पारा ३५ अंशांवर गेला आहे. मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी अद्याप ढगाळ स्थिती असल्याने तापमान सरासरीच्या आसपास आहे.