परतीच्या मान्सूनचे दमदार आगमन झाल्याने जिल्ह्य़ाने पावसाची निम्मी सरासरी ओलांडली आहे. जिल्ह्य़ात ५६ टक्के पावसाची नोंद झाली असून गुरुवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत नगर शहर आणि राहाता तालुक्यात तब्बल दोन इंच पावसाची नोंद झाली. मागच्या काही दिवसात सर्वच तालुक्यामंध्ये कमी-अधिक पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला आहे.
सुरुवातीच्या काळात जिल्ह्य़ात पावसाने चांगलाच ताण दिला. पावसाळा सुरू झाल्यानंतर तब्बल अडीच महिने त्याने जिल्ह्य़ाकडे पाठ फिरवली होती. त्यामुळे खरीप हंगमातील पिकांचे मोठे नुकसान झाले. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मात्र जुलै अखेरीस चांगला पाऊस झाला, हीच दिलासादायक बाब होती. मात्र उर्वरित जिल्हा कोरडाच राहिल्याने चिंता व्यक्त होत होती. मागच्या आठ दिवसांतील पावसाने मात्र जिल्ह्य़ात सरासरीच्या ५६.१२ टक्के पावसाची नोंद झाली आहे.
ऑगस्टच्या अखेरीस मघा नक्षत्राने मात्र जिल्ह्य़ावर कृपादृष्टी केली. गेल्या आठवडय़ापासून जिल्ह्य़ात सर्वत परतीच्या मान्सूनने दमदार हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. या काळात सर्वच तालुक्यात चांगल्या पावसाची नोंद झाली. नगर शहर व परिसरात गेल्या सहा दिवसांपासून दमदार पाऊस सुरू असून दोन वर्षांनंतर प्रथमच बुधवारी रात्री सीना नदी वाहती झाली. नगर तालुक्यातील जेऊर परिसरातही दिवसभर चांगला पाऊस झाल्याने रात्री साडेदहाच्या सुमारास सीना नदीला चांगलेच पाणी आले. कल्याण रस्त्यावरील नेप्ती पुलावरून पाणी वाहिले, त्यामुळे रात्री काही वेळ येथील रहदारीही बंद करण्यात आली होती. आज सकाळी संपलेल्या चोवीस तासांत शहर व परिसरात ४६ मिलिमीटर (सुमारे दोन इंच) पावसाची नोंद झाली. बुधवारी दुपारी शहर व परिसरात मुसळधार पाऊस झाला, त्यानंतरही बराच वेळ भुरभुर व अधूनमधून जोरदार सरी कोसळल्या. गुरुवारी पहाटेच पुन्हा पावसाला सुरुवात झाली. सकाळी साडेदहापर्यंत तो सुरू होता. त्यानंतर मात्र दिवसभर पावसाने उघडीप दिली. मागच्या सहासात दिवसांत प्रथमच शहरात दुपारनंतर पावसाने उसंत दिली.
जिल्ह्य़ातील पावसाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. कंसाबाहेरील आकडे गुरुवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या चोवीस तासांतील पावसाचे व कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे आहेत. सर्व आकडे मिलिमीटरमध्ये आहेत. अकोले- २ (५६१), संगमनेर- ५ (३२०.७), कोपरगाव- १२ (२२०), राहाता- ५५ (२८८.५), श्रीरामपूर- ३३ (४६५), नेवासे- १४ (१८८), राहुरी- ३८ (२४९.६), नगर- ४६ (३१६), शेवगाव- २१ (२५३), पाथर्डी- २५ (३१४), पारनेर- २० (१०६), कर्जत- १२ (२०४.३), श्रीगोंदे- १५ (१४४) आणि जामखेड- १० (२७७).
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 29, 2014 2:33 am