News Flash

कोल्हापूरला महापुराचा धोका; एनडीआरएफच्या पथकांना पाचारण

पंचगंगा नदीच्या पातळीत वाढ होऊ लागली असून आज नदी इशारा पातळी ओलांडण्याची चिन्हे दिसत आहेत

पंचगंगा नदीच्या पातळीत वाढ होऊ लागली असून आज नदी धोक्याची पातळी ओलांडण्याची चिन्हे दिसत आहेत

कोल्हापुरात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे धरण, नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पंचगंगा नदीच्या पातळीत वाढ होऊ लागली असून आज नदी इशारा पातळी ओलांडण्याची चिन्हे दिसत आहेत. पूर परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता लक्षात घेऊन एनडीआरएफची दोन पथके कोल्हापुरात येत आहेत. पुण्याहून ही पथके निघाली असून दुपारपर्यंत दाखल होणार आहेत.

कोल्हापूर जिल्ह्याला गेल्या दोन दिवसांपासून पावसाने झोडपून काढलं आहे. धुवाधार पावसामुळे जिल्ह्याचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गगनबावडा, शाहूवाडी, राधानगरी, भुदरगड, आजरा या तालुक्यात संततधार सुरू आहे. राधानगरी, काळम्मावाडी, चांदोली या धरणातील पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे . पंचगंगा नदीची पाणीपातळी आज सकाळी सात वाजता ३५ फूट होती. इशारा पातळी ३९ फूट आहे. पावसाचा जोर पाहता आज सायंकाळपर्यंत पंचगंगा नदी इशारा पातळी ओलांडण्याची शक्यता आहे.

एनडीआरएफ पथकांना पाचारण

कोल्हापूर जिल्ह्यात चार दिवस रेड अलर्ट देण्यात आला आहे. प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला आहे. महापुराची संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन सावधगिरीचा उपाय म्हणून एनडीआरएफच्या पथकांना पाचारण करण्यात आले आहे. आज सकाळी आठ वाजता पुणे येथून दोन पथके कोल्हापूरसाठी रवाना झाली असल्याचे एनडीआरएफच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तर कोल्हापूर जिल्ह्यातील संभाव्य महापूर परिस्थिती लक्षात घेऊन १ जून ते १५ ऑगस्टपर्यंत या पथकांना कोल्हापुरात तैनात करण्याचे नियोजन केले होते. शासनाने आज पथक पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. यापैकी एक पथक कोल्हापुरात असेल तर दुसरे महापुराचा अधिक धोका असलेल्या शिरोळ तालुक्यात असेल, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

वाहतूक विस्कळीत

दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक प्रमुख मार्ग पावसामुळे बंद झाले आहेत. कोकणाकडे जाणाऱ्या गगनबावडा येथील मार्ग बंद करण्यात आला आहे. तसेच रत्नागिरीकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. जिल्ह्यातील अनेक नद्यांचे पाणी पुलावर आल्याने स्थानिक पातळीवरची वाहतूक बंद करण्यात आली आहे.ती वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 22, 2021 8:56 am

Web Title: monsoon rain update ndrf team leaves from pune to kolhapur over flood like situation sgy 87
Next Stories
1 पंचगंगेचे पाणी दुसऱ्यांदा पात्राबाहेर
2 अपप्रवृत्तीने कोल्हापुरातील शेतकरी संघाची धूळधाण
3 विठू नामाच्या गजरात नंदवाळची वारी उत्साहात
Just Now!
X