मान्सूनने महाराष्ट्रात आगेकूच केली असून, येत्या ४८ तासांत मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. कोकणासह कोल्हापुरात मान्सून दाखल झाला आहे. मान्सून पुढील काही तासांत महाराष्ट्रात सक्रिय होणार असल्याची माहितीही हवामान खात्यानं दिली आहे.

कोकणात मान्सून दाखल झाला आहे. कोल्हापुरातही आगमन झाले आहे. काही तासांमध्ये मान्सून महाराष्ट्रात सक्रिय होणार आहे. तसेच पुढील ४८ तासांत मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस कोसळेल, असा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. पुढील ४८ तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही भाग आणि विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह दमदार पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील काही भागांत काल रात्रीपासूनच पावसाने दमदार हजेरी लावली. आज सकाळीही मुंबईसह उपनगरांमध्ये दमदार ‘एन्ट्री’ केली. पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग, कोकणात अनेक ठिकाणी रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईला लागूनच असलेल्या बदलापूर, कर्जत, नेरळ, माथेरान आदी परिसरातही काल रात्रीपासून पावसाने हजेरी लावली. कोल्हापुरातही पावसाचे आगमन झाले. बुलडाणा जिल्ह्यातही काल पावसाने दमदार हजेरी लावली होती. संध्याकाळपासूनच बुलडाणा, मेहकर, चिखली तालुक्यासह ग्रामीण भागात पाऊस जोरदार बरसला. रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरुच होता.