वायू चक्रीवादळामुळे मान्सूनच्या आगमानत बसलेली खिळ दूर झाली आहे. मान्सूनने आपली वाटचाल सुरू केली असून गुरूवारी पश्चिम किनारपट्टीवरच्या गोवा आणि महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रत्नागिरी या भागात वरूणराजाचं आगमन झालंय. तळकोकणातही पावसाने हजेरी लावली. एवढंच नाही तर आज म्हणजेच २१ जून रोजीही गोवा, कर्नाटक किनारपट्टी, महाराष्ट्र या ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे.

वायू या चक्रीवादळामुळे मान्सूनची तारीख पे तारीख सुरू होती. पण अखेर महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला आहे. दक्षिण कोकण ते केरळपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय होऊ लागला आहे. त्यामुळे मान्सून महाराष्ट्रात येऊन धडकला आहे. रत्नागिरी, कोल्हापूर, शिवमोगा, सालेम या भागांमध्ये पावसाला सुरूवात झाली आहे. मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी हवामान अत्यंत अनुकूल असून पुढील ७२ तासांमध्ये मान्सून महाराष्ट्रातला आणखी काही भाग, उत्तर कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये पोहचेल असेही आयएमडीने म्हटले आहे.