धनंजय मुंडे यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची फिरकी; विधान परिषदेतील निवृत्त सदस्यांना निरोप नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी देशाच्या सर्वोच्च सभागृहात निवडून यावे, अशी परमेश्वराकडे प्रार्थना केली व दुसरीकडे त्यांनी २०१९ च्या निवडणुकीत तटकरेंच्या विरोधातील त्यांच्या पक्षाचा उमेदवार निवडून यावा, यासाठीही परमेश्वराला साकडे घातले आहे. अशाप्रकारे मुख्यमंत्र्यांनी तटकरेंबाबत परमेश्वरालाच गोंधळात टाकले आहे, अशा शब्दात विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांची फिरकी घेतली. विधान परिषदेतील निवृत्त सदस्यांना निरोप देताना ते बोलत होते. सर्वप्रथम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, सुनील तटकरे हे अभ्यासू, चांगले वक्ते, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्राची आवड असलेले, नियोजनबद्ध काम करणारे, चिठ्ठी न घेता कोणत्याही विषयावर सभागृहात बोलणारे नेते आहेत. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचा त्यांना दांडगा अनुभव आहे. अर्थसह विविध खात्याचे मंत्री असताना त्यांनी आपले काम चोख पार पाडले. राज्यातील सर्व तीर्थक्षेत्रांना त्यांनी न्याय दिला. मतदारसंघातील प्रश्नांना त्यांनी नेहमी महत्त्व दिले. ते या सभागृहात नसताना त्यांची उणीव आम्हाला जाणवेल. तटकरे हे देशातील कोणत्याही सभागृहात गेले तरी अशाच प्रकारची उत्कृष्ट कामगिरी करतील, अशी आशा त्यांनी वर्तवली. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही सुनील तटकरे यांची विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातील कामकाजाची प्रशंसा केली. त्यांची उणीव सभागृहात कधीही भरून निघू शकणार नसल्याचे ते म्हणाले. शिवसेनेचे दिवाकर रावते यांनीही कार्यकाळ संपणाऱ्या माणिकराव ठाकरे, विजय ऊर्फ भाई गिरकर, जयंत पाटील, अनिल परब, शरद रनपिसे यांची मुक्तकंठाने प्रशंसा केली. सोबतच सभागृहात पुन्हा निवडून आल्याबद्दल महादेव जानकर, संजय दत्त, जयदेवराव गायकवाड, अमरसिंह पंडित, नरेंद्र पाटील यांचे अभिनंदन केले. जानकरांनी मेंढय़ांना पुन्हा विमानात बसवावे महादेव जानकरांनी खरा बाणा दाखवत प्रथमच स्वत:च्या पक्षातून विधान परिषदेत प्रवेश केला. त्यांच्या तोंडातून जय मल्हार ऐकून सर्वाना स्फूर्ती मिळते. त्यांच्या मंत्रीपदाच्या कार्यकाळात त्यांनी नागपूरच्या विमातळावरून म्या. म्या करत परत आलेल्या मेंढय़ा पुन्हा विमानात बसवून विदेशात पाठवण्याची व्यवस्था करावी, अशी मिश्कील टिप्पणीही केली.