खासगी आरोप-प्रत्यारोप

नागपूर : शेतकऱ्यांवर कर्जबाजारी होण्याची वेळ कुणामुळे आली, या विषयावरून राष्ट्रवादीचे आमदार अमरसिंह पंडित आणि भाजपचे आमदार सुरेश धस यांच्यात खडाजंगी झाली. आरोप-प्रत्यारोपाचे रूपांतर शाब्दिक चकमकीत झाले. चकमक संपण्याऐवजी युद्धात परावर्तीत होत असल्याचे दिसून आल्यानंतर सत्ताधारी व विरोधकांनी आपापल्या आमदारांना आवरले.

विधान परिषदेचे दिवसभराचे कामकाज सुरळीत आणि शांतपणे पार पडले. नियम २६० अन्वये शेतकरी सन्मान योजनेवर चर्चा सुरू झाली. राष्ट्रवादीचे आमदार अमरसिंह पंडित यांनी चर्चेची सुरुवात केली. सुमारे तासभराच्या भाषणात अमरसिंह पंडित यांनी सरकारच्या कारभारावर टीकास्त्र सोडले. अमरसिंहानंतर रामहरी रूपनवर, सुनील तटकरे यांची भाषणे झाली. यानंतर परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी भाजपचे आमदार सुरेश धस यांना बोलण्याची संधी दिली. त्यांनी जिल्हा बँकेच्या विषयावरून पंडित त्यांच्याकडील थकबाकीचा उल्लेख केला. जयभवानी सहकारी साखर कारखान्याकडे ४५ कोटी, माऊली सूतगिरणीकडे ८० लाख, शनिदेव पतसंस्थेकडे ९० लाख रुपये थकबाकी असल्याचा पाढा वाचण्यास त्यांनी सुरुवात केली. यादरम्यान अमरसिंह पंडित संतापले आणि गंभीर विषयाला वैयक्तिक वळण देऊन द्वेषापोटी बोलत असल्याचा आरोप त्यांनी केला. आव्हान-प्रतिआव्हाने वाढत गेल्याने सभागृहातील वातावरणही तापले. यात विरोधी बाकावरील सदस्यांनी आक्षेप घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी या वादात उडी घेतली. शेतकऱ्यांच्या आजच्या अवस्थेला कोण जबाबदार आहे हे जाणून घ्यायचे असेल तर त्यासाठी वेगळे अधिवेशनच घ्यावे लागेल. ‘करून करून भागले आणि देवपूजेला लागले’ असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला. सभागृहाचे कामकाज संपल्यानंतर दोघांनीही एकमेकांना वैयक्तिक आव्हाने दिली. अखेरीस सत्ताधारी व विरोधक यांनी आपापल्या आमदारांना आवरले. दरम्यान, या विषयावरील चर्चा ‘ऑन लेग’ ठेवण्यात आल्याने उद्या, गुरुवारी पुन्हा हा संघर्ष सभागृहाला पाहायला मिळण्याची शक्यता आहे.