विधीमंडळाच्या पावासाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली. मात्र अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी व विरोधक समोरा-समोर आले, एवढच नाही तर अध्यक्षांच्या दालनाबाहेर विरोधक व सत्ताधाऱ्यांमध्ये धक्काबुक्की देखील झाली. यामुळे सभागृहात गोंधळ घातल्याप्रकरणी भाजपाच्या १२ आमदारांचं एका वर्षासाठी निलंबन करण्यात आलं आहे. दरम्यान या कारवाईवरुन संताप व्यक्त करत विरोधीनेत्यांनी कामकाजावर बहिष्कार टाकला. दरम्यान भाजपा आमदार आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर तिखट शब्दात टीका केली आहे.

आशिष शेलार म्हणाले, “आज सभागृहात जी घटना घडली आणि त्यावर ज्या पद्धतीची शिक्षा सुनावली गेली. हा सगळा प्रकार बघितल्यावर तालिबानी संस्कृतीला सुद्धा लाजवेल, असे नवे तालिबानी ठाकरे सरकार निघाले. त्यामुळे हे नवे तालिबानी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाने महाराष्ट्रात राज्य करू पाहत आहेत. याचा मी जाहीर निषेध करतो.”

नो बॉलमध्ये विकेट काढण्याचा शिवसेनेचा प्रयत्न

“अध्यक्षांच्या दालनात शिवी देणारे सदस्य हे भाजपाचे नव्हते. तरी सन्मानीय तालिका सभापती भाष्कर जाधव यांची संपुर्ण पक्षाच्या वतीने मी माफी मागितली. तसेच स्वता तालिका अध्यक्षांनी हे मान्य केलं आहे. मी छगन भुजबळ यांनी मांडलेल्या ठरावावर केवळ १० मिनिटे हरकतीचा मुद्दा मांडला. ओबीसी समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवण्याची भुमिका छगन भुजबळ यांनी मांडली त्या विरोधातील माझा मुद्दा होता. मी माफी मागून सुद्धा माझ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. तालिबानी ठाकरे सरकारचे अभिनंदन, पण जनतेतील लढाई आषिश शेलार आणि भाजपा आणखी तिव्र करेल. माझा सामना करण्याची ताकद शिवसेनेमध्ये नाही म्हणून त्यांनी नो बॉलमध्ये विकेट काढण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. मी क्रिकेटचा खेळाडू आहे. मी दोन्ही हाताने बॉलिंग करेन आणि सभागृहाबाहेर तुमची पळता भुई थोडी करून टाकेन”, असे आव्हान आशिष शेलार यांनी शिवसेनेला दिले.

हेही वाचा- भाजपा आमदारांनी शिव्या दिल्या, मी फडणवीसांना म्हणालो आवरा पण… ; अध्यक्षांनी सांगितलं काय घडलं

कुणालाही शिवी दिली नाही

“भाजपाच्या कुठल्याही सदस्याने, मी स्वता सन्माननीय भाष्कर जाधव किंवा कुणालाही शिवी दिली नाही. आमच्या पक्षाचे सदस्य पिठासिन अधिकाऱ्याच्या जवळ गेले होते. त्यांना मी खाली खेचून आणलं. हे सगळ व्हिडीओ लाब्ररी आणि प्रेस गॅलरीने पाहिलं आहे. ओबीसींच्या आरक्षणाच्या विषयात बोलू न देल्यामुळे संविधानिकरीत्या त्रागा व्यक्त करणाऱ्या आमच्या सदस्यांना सुद्धा जाग्यावर बसवण्याचं काम मी केलं. हे संपुर्ण सभागृहाने पाहिलं आहे.” असे शेलार म्हणाले.

या आमदारांचे झाले निलंबन

सभागृहात गोंधळ घातल्याप्रकरणी भाजपाच्या १२ आमदारांचं एका वर्षासाठी निलंबन करण्यात आलं आहे. पराग अळवणी, राम सातपुते, संजय कुटे, आशिष शेलार, अभिमन्यू पवार, गिरीश महाजन, अतुल भातखळकर, शिरीष पिंपळे, जयकुमार रावल, योगेश सागर, नारायण कुचे, किर्तीकुमार बागडिया यांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आलं आहे. हे निलंबन करण्यापूर्वी तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी आपली बाजू मांडली. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली बाजू मांडली. देवेंद्र फडणवीस यांनी विनंती केली की, अशी कारवाई करू नका, मात्र त्यानंतरही १२ आमदारांवर कारवाई करण्यात आली. तालिका अध्यक्षांसोबत गैरवर्तन केलेल्या आमदारांच्या निलंबनाचा ठराव अनिल परब यांनी मांडला आणि तो मंजूर करण्यात आला. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेतला. सभागृहात हा ठराव एकतर्फी मांडण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला व सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकत भाजपाने सभात्याग केला.