मुसळधार पावसाने छानदार सलामी दिली आहे. मात्र वादळी वाऱ्यामुळे झाडे उन्मळून घरा-मांगरावर पडली तर बागायतीचेही प्रचंड नुकसान झाले. जिल्ह्य़ात सरासरी १०.४७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
वादळी वाऱ्याने जिल्हाभरात झाडे उन्मळून पडली. रस्त्यावर, घरावर, मांगरावर झाडे उन्मळून पडली. अनेक ठिकाणी पत्रे उडाले तसेच घराची कौलेही उडाली. त्यामुळे गावागावात नुकसान झाले.
केळी बागायतीही या वादळी वाऱ्यात सापडल्या. त्यामुळे केळी बागायतीच्या नुकसानीस सामोरे जावे लागले आहे. केळी बागायतीचे पंचनामे करण्याची मागणी करण्यात आली.
आज सोमवारी दुपारपासून पावसाने झोडपून काढले. सावंतवाडीत हंगामी पावसाचे वातावरण बनले होते. या वादळी वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसाने सर्वाचीच दाणादाण उडवली. शेतकऱ्यांनी या पावसाच्या सलामीने समाधान व्यक्त केले आहे. हंगामी पावसाचे वेळापत्रक कोलमडणार नाही अशी अपेक्षा शेतकरी वर्ग मनाशी बाळगून आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात १ जूनपासून आजपर्यंत सरासरी ५५.८२ मि.मी. पाऊस कोसळला आहे. आज एका दिवसात ८०.८० मि.मी. म्हणजे सरासरी १०.४७ मि.मी. एवढा पाऊस नोंदला गेला आहे. मिरगाचा पाऊस जिल्हाभरात कोसळला आहे.
या पावसाची तालुकानिहाय दोडामार्ग ३ मि.मी., सावंतवाडी १६ मि.मी., वेंगुर्ले ४.८ मि.मी., कुडाळ ४ मि.मी., कणकवली १३ मि.मी., देवगड १२ मि.मी., मालवण ३१ मि.मी., तर वैभववाडीत पावसाची नोंद नाही. जिल्हाभरात ८०.८० मि.मी. म्हणजेच सरासरी १०.४७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
हंगामी पावसाचे आगमन उशिराने झाले असले तरी सलामीच्या पावसाने छानदार सलामी दिली आहे. मात्र वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या पावसाने बागायतदार शेतकऱ्यांसह सर्वानाच नुकसानीचा धक्का दिला. पावसाच्या छानदार सलामीने शेतीच्या कामाना प्रारंभ  झाला आहे.