केरळमध्ये पावसाचा नवा मुहूर्त ३ जून

पुणे : अंदमानातील जोरदार प्रवेशानंतर वेगाने कूच करणाऱ्या नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या प्रवासाला सध्या पोषक स्थिती नसल्याने खीळ बसली आहे. त्यामुळे त्यांचे केरळमधील आगमन लांबणीवर पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. हवामान विभागाने मोसमी वारे केरळमध्ये दाखल होण्याचा नवा मुहूर्त ३ जून असा जाहीर केला आहे. ते तेथे पोहोचल्यानंतरच  त्यांची महाराष्ट्राकडे वाटचाल होण्याचा अंदाज आहे.

अरबी समुद्रात निर्माण झालेले तौक्ते चक्रीवादळ विरल्यानंतर मोसमी वाऱ्यांच्या आगनमाचे संकेत मिळाले होते. त्यानुसार २१ मे रोजी मोसमी वाऱ्यांनी अंदमान आणि निकोबार बेटांवर प्रवेश केला. दुसऱ्याच दिवशी २२ मे रोजी त्यांनी मोठा पल्ला गाठत थेट श्रीलंकेपर्यंत धडक मारली. बंगालच्या उपसागरातील मोठा भाग मोसमी वाऱ्यांनी एकाच दिवसात व्यापला. २५ मेपर्यंत श्रीलंकेचा निम्म्या भागात त्यांनी प्रवेश केला. मात्र, याच कालावधीत त्यांची एक दिवसाआड प्रगती होत राहिली. २७ मे रोजी कोमोरीन आणि मालदिवचा बराचसा भाग त्यांनी व्यापला. परंतु त्यानंतर ३० मेपर्यंत त्यांची प्रगती थांबली.

सुरुवातीच्या काळात वेगाने मोसमी वारे मार्गक्रमण करीत असल्याने १ जूनचे केरळमधील नियोजित आगमन एक दिवस आधीच म्हणजे ३१ मे रोजी होईल, असा हवामान विभागाचा अंदाज होता. त्याचवेळी चार दिवस पुढे-मागे होण्याची शक्यताही गृहीत धरली होती.

मंगळवारी पोषक स्थिती

सध्या मोसमी वाऱ्यांची प्रगती थांबली असली तरी १ जूनला पोषक स्थिती निर्माण होऊन त्यांना गती मिळण्याची शक्यता आहे. त्यानुसार केरळमध्ये त्यांचे आगमन ३ जूनला होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

प्रवास का थांबला?

अंदमान आणि निकोबार बेटांवर मोसमी वाऱ्यांनी २१ मे रोजी प्रवेश केला. त्याच वेळी बंगालच्या उपसागरात यास चक्रीवादळाचे संकेत होते. हे चक्रीवादळ ओडिशाच्या किनारपट्टीला धडकले. त्याने मोसमी वाऱ्यांच्या प्रवाहाला चालना दिल्याने २५ मेपर्यंत त्यांची प्रगती झाली. पंरतु सध्या वारे सक्रिय नाहीत आणि पुरेसे बाष्पही नाही. पावसाने तेथेही दडी मारली आहे. मोसमी वाऱ्यांचा प्रवास थांबला आहे. १ जूनपासून मात्र मोसमी वारे सक्रिय होण्याची शक्यता आहे.