राज्यभरात पावसाच्या रिमझिम सरी कोसळत आहे. त्यातच कोकण, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात गेल्या ८ ते १० दिवसांपासून अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यातच पुन्हा येत्या ४८ तासात उत्तर मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या ४ ते ५ दिवसात राज्यात बऱ्याच ठिकाणी विजांच्या कडकडाटासहित मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. शेवटच्या दिवसांत सर्वात जास्त पाऊस मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात पडेल.

कोकणच्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर राज्यातील यलो अलर्ट देण्यात आला आहे. ऑरेंज अलर्ट दिलेल्या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, धुळे, नंदुरबार, कोल्हापूर, सांगली, बीड, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांत पुढील ३-४ तासांत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

आज सकाळपर्यंत मुंबई आणि ठाणे उपनगर परिसरात चांगल्या पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर ६ सप्टेंबर रोजी रायगड, रत्नागिरी, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यांना तर ६ सप्टेंबर रोजी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक, औरंगाबाद, जालना या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर, ८ तारखेला पालघर, रायगड, रत्नागिरी, सातारा, पुणे जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, कोकण किनारपट्टी लगतच्या मासेमारांना सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.