मुंबई आणि उपनगरे तसेच कल्याण, अंबरनाथ आणि वसई – विरार परिसरात पावसाने दोन दिवसापासून धुमाकूळ घातला आहे. याशिवाय रायगड, पेण, नागोठणे या परिसरात देखील पावसाचा जोर कायम आहे. काल सकाळपासून सुरु असलेल्या पावसाने अद्यापही विश्राम घेतलेला नाही. त्यामुळे नवी मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोरबे धरण सततच्या पावसामुळे ओव्हरफ्लो होण्याच्या तयारीत आहे.

केवळ मुंबईतच नव्हे तर संपूर्ण राज्यभरात पावसाने जोर धरला असून सर्वत्र पावसाचा फटका बसला आहे. राज्यातील प्रमुख धरणे सततच्या पावसामुळे ओव्हरफ्लो झाली आहेत. साताऱ्यामधील कोयना, नाशिकमधील नांदूर मध्यमेश्वर, मुंबईला पाणीपुरवठा करणारे भातसा विदर्भातील भंडारा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. नवी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणाचीही पाणी पातळी झपाट्याने वाढत असून जादाचे पाणी मूळ नदीपात्रात सोडण्याबाबत शनिवारी परिपत्रक जारी केले आहे.

प्रशासनाने जारी केलेल्या परिपत्रकामध्ये म्हटले आहे की मोरबे धारण हे नवी मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत येते. मोरबे धरणाची पूर्ण संचय पातळी ही तलांक ८८ मीटर इतकी आहे. शनिवारी या धरणात १० च्या सुमारास ८७ मीटर तलांक असून एकूण जलसाठा १८०.९०५ दशलक्ष लीटर घनमीटर इतका आहे. मोरबे धरणाची पाणी पातळी ओव्हरफ्लोच्या नजीक पोहोचली असल्याचेही प्रशासनाने सांगितले होते. त्यामुळे जादाचे पाणी सांडव्यावरील दोन वक्राकार दरवाजे उघडे करून मूळ नदीपात्रात सोडावे लागणार आहे. त्यामुळे मोरबे धरणाचे दरवाजे उघण्यापूर्वी अगोदर कळवण्यात येणार असून मोरबे धरणाच्या खालील बाजूस असलेल्या धावरी नदीच्या काठावर असलेल्या गावांना नदीपात्रात इथून पुढे कोणीही जाऊ नये, असे आवाहन केले असून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. जोरदार पावसामुळे रेल्वेसेवेवर परिणाम झाला आहे. रात्रभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव मुंबईतील अनेक ठिकाणी पोलिसांनी रस्ते वाहतूक बंद केली आहे. तसेच गरज असेल तरच घराबाहेर पडा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.