गणेशोत्सवानंतर रायगड जिल्ह्यत अलिबाग तालुका हा करोनाचा हॉटस्पॉट बनतो आहे. सलग पाच दिवस दररोज तालुक्याात १०० हून अधिक करोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे तालुक्यात करोनाचा धोका वाढत चालला आहे.

गणेशोत्सवानंतर जिल्ह्यात करोना रुग्णांची संख्या वाढेल, असा प्रशासनाचा अंदाज होताच.  तो खरा ठरतो आहे. अलिबाग तालुक्यात दररोज वाढणारी क रोना रुग्णांची संख्या चिंताजनक आहे. अलिबाग तालुक्यात ४ सप्टेंबरला १२३, ५ सप्टेंबर रोजी १०९ , ६ सप्टेंबर रोजी १००, ७ सप्टेंबर रोजी १०१ तर ८ सप्टेंबर रोजी ११४ असे करोनाचे नवीन रुग्ण आढळले आहेत. यातील बहुतांश रुग्ण हे ग्रामीण भागातील असल्याचे दिसून येते. यावरून अलिबागच्या  ग्रामीण भागात करोनाने आपले चांगलेच बस्तान बसवल्याचे दिसून येत आहे. पनवेल महापालिका क्षेत्र वगळता जिल्ह्य़ातील सर्व तालुक्यांमध्ये रुग्णसंख्या वाढत अलिबाग तालुका आघाडीवर असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

त्यामुळे तालुक्यातील एकूण रुग्णसंख्या २ हजार ८१९ वर पोहोचली आहे .

आतापर्यंत २ हजार १३ रुग्णांनी करोनावर मात केली असली तरी ६९ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. ७३७ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.