27 November 2020

News Flash

शिकारीमुळे खवले माजरांची ८० टक्के संख्या कमी

भारतीय पँगोलीनचे वर्तन आणि एकूणच त्याची पर्यावरणीय माहिती फार कमी आहे.

 

दक्षिण-पूर्व आशियाई देशात मांसाला अधिक मागणी

नागपूर : जागतिक पातळीवर पँगोलीनची (खवले मांजर) संख्या झपाटय़ाने कमी होत असून ५० ते ८० टक्क्यांनी या वर्गाची संख्या घसरली आहे. चीन आणि दक्षिण-पूर्व आशियाई देशात पँगोलीनच्या मांसाला अधिक मागणी आहे. तसेच पारंपरिक चिनी औषधांसाठीही त्याचा वापर होत असल्याने शिकारीचे प्रमाण वाढले आहे.

पँगोलीनची शिकार रोखण्यासाठी आणि पर्यावरणातील त्याचे महत्त्व समजून घेण्यासाठी वन्यजीव संवर्धन संस्था (वाईल्डलाईफ कन्झर्वेशन ट्रस्ट) आणि मध्यप्रदेश वनखात्याने एक प्रभावी संवर्धन योजना सुरू केली आहे. या प्रकल्पात या प्रजातीला रेडिओ टॅग करणे आणि संकटात सापडलेल्या या प्रजातीचे संवर्धन करणे या आव्हानात्मक कामाचा समावेश आहे. अलीकडेच त्यांनी दोन भारतीय पँगोलीनला यशस्वीरित्या जंगलात सोडले आहे. तसेच नवव्या जागतिक पँगोलीन दिनानिमित्त मध्यप्रदेश वनखात्याने सातपुडा व्याघ्र प्रकल्पातून जगातील पहिले भारतीय पँगोलीन यशस्वीरित्या रेडिओ-टॅग केले आहे. भारतात सर्वात मोठी तस्करी पँगोलीनची केली जाते. दात नसलेल्या या प्राण्याची उत्क्रांती लाखो वर्षांपूर्वी झाली. संरक्षणाचे साधन समजल्या जाणाऱ्या या प्राण्याच्याच संरक्षणाची वेळ आता आली आहे. पँगोलीनच्या आठ प्रजातींपैकी भारतीय पँगोलीन आणि चायना पँगोलीन भारतात आढळतात. भारतासह श्रीलंका, बांगलादेश आणि पाकिस्तानात भारतीय पँगोलीनची नोंद झाली आहे. वन्यजीव संवर्धन कायदा १९७२ अंतर्गत हा प्राणी अधिसूची एकमध्ये समाविष्ट आहे. संरक्षणात्मक उपाय असूनही भारतातील पँगोलीनचे स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठय़ा प्रमाणात शिकार करून त्याचा वापर केला जातो.

भारतीय पँगोलीनचे वर्तन आणि एकूणच त्याची पर्यावरणीय माहिती फार कमी आहे. या लुप्तप्राय प्रजातींसाठी प्रभावी संवर्धन योजना विकसित करण्यासाठी त्याचे पर्यावरणातील महत्त्व जाणून घेणे गरजेचे आहे. शिकारविरोधी कारवायांमध्ये सापडणारे पँगोलीनचे अवशेष हे खूप वर्षांआधी मृत पावलेल्या पँगोलीनचे आहेत. मध्य भारतात अनेक पँगोलीन वाचवण्यात यश आले आहे.

नऊपेक्षा अधिक राज्यातून शिकार आणि तस्करांना अटक करून यशस्वीरित्या पँगोलीनची सुटका केली आहे, असे मध्यप्रदेश वनखात्याचे मुख्य वन्यजीव संरक्षक राजेश श्रीवास्तव यांनी सांगितले. अलीकडेच दोन पँगोलीनचे यशस्वीरित्या पुनर्वसन केले असून ही पहिलीच घटना आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून या पुनर्वसित पँगोलीनवर लक्ष ठेवले जात आहे, असे सातपुडा व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक व मुख्य वनसंरक्षक एस.के. सिंग यांनी सांगितले.ह्ण मध्य भारतातील लँडस्केपमध्ये अनेक पँगोलीनला जीवदान देण्यात आले आहे. वन्यजीव संवर्धन संस्था आणि मध्यप्रदेशने घेतलेल्या या पुढाकारामुळे संकटात सापडलेल्या प्रजातीच्या संख्येवर सकारात्मक परिणाम व्हावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. – आदित्य जोशी, वन्यजीव जीवशास्त्रज्ञ, वन्यजीव संवर्धन संस्था.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 15, 2020 1:12 am

Web Title: more demand for meat in southeast asian country pangolin akp 94
Next Stories
1 समाजकंटकांनी पुन्हा २२ वाहने फोडली
2 अतिक्रमणाचा प्रश्न कायद्याने सुटणार नाही, त्यासाठी लोकचळवळ हवी!
3 रोजगार मागणारे नव्हे,  रोजगार देणारे बना!
Just Now!
X