पालघर जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागात १३ हजारांहून अधिक रुग्ण 

पालघर :  नोव्हेंबर २०२० ते फेब्रुवारी २०२१ दरम्यान नियंत्रणात असणाऱ्या करोना संसर्ग मार्चपासून झपाटय़ाने वाढू लागला. एप्रिल महिन्याच्या उत्तरार्धामध्ये पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात १३ हजारहून अधिक करोना रुग्णवाढ झाली असून सुमारे १५० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  मार्चच्या दुसऱ्या पंधरवडय़ात एक हजारपेक्षा अधिक व नंतर दर आठवडय़ाला जवळपास दुपटीने रुग्णवाढ झाली आहे.

होळी सण, लग्न व इतर समारंभांप्रसंगी होणारी गर्दी आणि त्यात    नियमांचे मोठय़ा प्रमाणात झालेले उल्लंघन यामुळे रुग्णवाढ झपाटय़ाने झाली. फेब्रुवारी-मार्च महिन्यांत  पाच मृत्यू झाल्याची नोंद आहे. फेब्रुवारी महिन्यात २३४ तर मार्चचा पहिला पंधरवडय़ात २४८ रुग्णवाढ झाल्याचे दिसून आले.   एप्रिलच्या मध्यापासून आठवडय़ाला चार ते पाच हजार नवीन रुग्णवाढ झाली. या काळात आठवडय़ाला ३५पेक्षा अधिक मृत्यू झाले. १९  ते २५ एप्रिल या काळात ग्रामीण भागात तब्बल ८१ मृत्यू नोंदवण्यात आले आहे.   एप्रिलच्या अखेरीपर्यंत  ग्रामीण भागात दररोज ७०० ते ९०० नवे रुग्ण आढळून आले. मेमध्ये पहिल्या आठवडय़ामध्ये  लाट काहीशी ओसरली असून दररोज ५०० ते ६०० नवीन रुग्ण आढळत आहेत.

आकडेवारीत तफावत

आरोग्य विभागाकडून प्राप्त  आकडेवारी ही प्रत्यक्षात तपासणी केलेल्या नागरिकांवर आधारित आहे. अनेक नागरिकांना  लक्षणे असताना त्यांनी तपासणी केली नसल्याची उदाहरण आहेत. उपचारासाठी  जिल्ह्याबाहेर सरासरी १२०० ते १४०० रुग्ण  असताना त्यांच्यापैकी अनेकांचे मृत्यू जिल्ह्याबाहेर झाले आहेत. अशा मृतांची नोंद जिल्ह्यात झाली नसून प्राप्त झालेल्या आकडेवारीपेक्षा किमान दीड पटीने रुग्णसंख्या व मृत्यूसंख्या असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

तपासणीवर भर

रुग्ण शोध लवकर घेऊन त्वरित उपचार करण्याच्या दृष्टीने  प्रशासनाने प्रतिजन चाचणीवर भर दिला आहे. आरटीपीसीआर चाचणीची मर्यादा दररोज आठशे ते हजार इतकी असताना ती अडीच ते तीन हजार   चाचणी करण्याचे उद्दिष्ट   आरोग्य विभागाने ठेवले होते. एप्रिलच्या शेवटच्या दोन आठवडय़ात सुमारे ४८ हजार ५०० संशयितांची तपासणी करण्यात आल्याचे दिसून आले आहे.

रुग्णवाढ

कालावधी                   नमुने तपासणी         करोना रुग्ण         मृत्यू

१  ते २८ फेब्रुवारी             १०८५८              २३४                        २

१ ते १४ मार्च                    ६११५               २४८                       १

१५  ते २८ मार्च                ७७६७               १०११                      २

२९ मार्च ते  ४ एप्रिल          ४२६९               ११२१                    ९

५  ते ११ एप्रिल                ७९७५               २२०६                    १०

१२ ते १८ एप्रिल               ७५६७               ३९१९                    ३७

१९  ते २५ एप्रिल              २२४६२              ४८२४                   ८१

२६ एप्रिल – २ मे             २६०२७              ४९६१                    ३६