गर्दीचा ओघ अजूनही कायम, आतापर्यंत २०० कोटींची नोंद

मैत्रीय कंपनीच्या माध्यमातून फसवणूक झालेल्या नगर जिल्ह्य़ातील गुंतवणूकदारांची संख्या २० हजारांवर तर फसवणूक झालेल्या गुंतवणुकीचा आकडा सुमारे २०० कोटींवर जाऊन पोहचला आहे. मात्र अद्यापि तक्रार करणाऱ्या गुतंवणुकदारांचा ओघ काही कमी झालेला नाही. जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातील आर्थिक गुन्हे शाखेपुढे या तक्रारदारांची गर्दी कायम आहे. काही गुंतवणुकदार तर परजिल्ह्य़ातूनही येत आहेत. हवालदिल छोटे छोटे गुंतवणूकदार पैसे परत कधी व कसे मिळणार याचीही चौकशी करत आहेत. मात्र त्यांच्या या प्रश्नांना उत्तर मिळत नाही. जिल्ह्य़ातील गुंतवणुकदारांची संख्या २६ हजारांहुन अधिक असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

जिल्ह्य़ात विविध कंपन्यांनी अधिक व्याजाचे आमिष दाखवत, मोठा परतावा मिळेल, अशी प्रलोभने दाखवत गुंतवणुकदारांची फसवणूक केल्याची अनेक उदाहरणे आहेत. यासंदर्भातील अनेक गुन्हे पोलिसांकडे दाखल आहेत. त्यातील मैत्रेय कंपनीकडून फसवणूक झालेल्या गुंतदवणुकीचा आकडा सर्वाधिक आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस उपअधीक्षक प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक पी. पी. भोसले व पोलिस नाईक बी. बी. बडे यांचे पथक मैत्रेय कंपनीच्या आर्थिक घोटाळ्याचा तपास करत आहेत.

कंपनीचे कार्यालय नगर शहरातील मंगलगेट भागातील पोलिस चौकीसमोरच होते. सन २००६-०७ मध्ये नगरचे कार्यालय सुरु झाले. मैत्रेय ग्रुप ऑफ कंपनीजच्या माध्यमातून मैत्रेय रियलचर अँड कन्स्ट्रक्शन, मैत्रेय सुवर्णसिद्धी प्रा. लि. मैत्रेय सव्‍‌र्हिसेस प्रा. लि. व मैत्रेय प्लॉटर्स अँड स्ट्रक्चर्स या चार कंपन्या कार्यरत होत्या. कंपनीने राज्यभर कार्यालये उघडली होती. अधिक व्याजदराचे आमीष दाखवत, मोठा परतावा मिळेल, असे प्रलोभन दाखवत छोटय़ा, छोटय़ा गुंतवणूकदारांकडून कंपनीने ठेवी मिळवल्या. त्यासाठी एजंट नियुक्त केले. गावोगाव नियुक्त केलेल्या या एजंटला मोठय़ा कमिशनचेही आमिष दाखवले. मुदत संपल्यानंतरही ठेवी परत मिळेनाशा झाल्याने गुंतवणुकदारांनी तक्रारी करण्यास सुरुवात केली, कंपनीची ही फसवणूक राज्यभर होती. कंपनीने नगर शहरातील कार्यालय सन २०१६ मध्ये बंद केले.

नगरमधील पहिला गुन्हा नगर शहरातील तोफखाना पोलिसांकडे एप्रिल २०१८ मध्ये दाखल झाला. कंपनीचेच एजंट सतीश पाटील (कोपरगाव) यांच्या फिर्यादीनुसार कंपनीचे अध्यक्ष व तीन संचालकांविरुद्ध २३ कोटी रुपयांच्या रकमेचा फसवणूक व अपहार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला, त्याची व्याप्ती पाहून गुन्ह्य़ाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला. शाखेने गेल्या महिन्यात जिल्ह्य़ातील गुंतवणूकदारांना तक्रार नोंदवण्याचे आवाहन केले. तशी तक्रार करणाऱ्यांची मोठी रिघच पोलिस अधीक्षक कार्यालयात लागलेली आहे. शाखेने त्यासाठी छापील अर्जच तयार करुन घेतला आहे. गुंतवणूकदाराचे नाव, किती रक्कम, किती वर्षांसाठी कोणामार्फत गुंतवणुक केली, त्याचे प्रमाणपत्र, पॅनकार्ड व इतर कागदपत्रे जमा करुन घेतली जात आहेत.

तक्रार नोंदवण्यासाठी एजंट, गुंतवणुकदार यांची रोज सकाळपासून आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयापुढे रांग लागते. कार्यालयापुढील मोकळ्या जागेत बसून अर्ज भरुन दिले जात आहेत. यात बहुसंख्य महिला आहेत. आजपर्यंत सुमारे २ हजार २०० एजंट व गुंतवणुकदारांनी तक्रारी नोंदवल्या आहेत. एका एजंटकडील गुंतवणुकदारांची संख्या कमीत कमी ५ पासून ते ५० पर्यंत आहे. काही अपवादात्मक एजंटकडील गुंतवणुकदारांची संख्या १०० ही आहे. परजिल्ह्य़ातील रहिवासी परंतु नगरमधील मैत्रेय कंपनीकडे गुंतवणुक केली, असेही अनेकजण आहेत. पैसे परत मिळण्यासाठी आणखी किती काळ प्रतीक्षा करावी लागणार, असेच प्रश्नचिन्ह या गुंतवणुकदारांच्या चेहऱ्यावर असते.

मैत्रेय कंपनीकडून झालेल्या फसवणूकीबाबत तक्रार करण्यासाठी येणाऱ्या  गुंतवणूकदारांची जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील गर्दी महिन्यानंतरही कमी झालेली नाही.