09 July 2020

News Flash

पावसाने नऊ दिवसांतच तब्बल २४२ टँकर बंद

गणरायाच्या आगमनाबरोबरच जिल्ह्य़ात सर्वत्र पाऊस सक्रिय झाला असून शुक्रवारी पहाटेपासूनच जिल्ह्य़ातच सर्वदूर दमदार पावसाने हजेरी लावली.

गणरायाच्या आगमनाबरोबरच जिल्ह्य़ात सर्वत्र पाऊस सक्रिय झाला असून शुक्रवारी पहाटेपासूनच जिल्ह्य़ातच सर्वदूर दमदार पावसाने हजेरी लावली. नगर शहर व परिसरात पहाटे सहा वाजताच आलेला पाऊस दुपारी चार वाजेपर्यंत सुरूच होता. दरम्यान परतीच्या पावसामुळे जिल्ह्य़ातील १० तालुक्यांत पावसाची निम्मी सरासरी ओलांडली आहे. जिल्ह्य़ात ६३.४८ टक्के पावसाची नोंद झाली आहे. या पावसाने नऊ दिवसांतच जिल्ह्य़ातील पिण्याच्या पाण्याचे २४२ टँकर बंद झाले आहेत.
गेले आठ-दहा दिवसांपासून परतीचा पाऊस जिल्ह्य़ात सक्रिय झाला असून पूर्वा नक्षत्राचा उत्तरार्ध आणि त्यानंतर गेल्या रविवारपासून सुरू झालेल्या उत्तरा नक्षत्राने जिल्ह्य़ावर पावसाची चांगलीच कृपा केली आहे. गेल्या दहा दिवसांपासूर्वी म्हणजे पूर्वा नक्षत्राच्या उत्तरार्धापर्यंत अकोलेचा अपवाद वगळता तेराही तालुक्यातील १० ते १५ टक्क्य़ांपुढे पाऊस झाला नव्हता. गेल्या दहा दिवसांत मात्र चौदापैकी दहा तालुक्यांनी निम्मी सरासरी ओलांडली आहे. संगमनेर (४३.२१ टक्के), राहुरी (४८.७८), कर्जत (३७.९२) आणि जामखेड (४५.३७) हे चार तालुके वगळता उर्वरित दहा तालुक्यांत पावसाने निम्मी सरासरी ओलांडली आहे. यात शुक्रवारी सकाळपर्यंतच्याच पावसाची नोंद असून जिल्ह्य़ात शुक्रवारीच सर्वत्र मोठा पाऊस झाला असून तो लक्षात घेतला तर या चारपैकी काही तालुक्यातही निम्मी सरासरी ओलांडली जाण्याची शक्यता आहे.
जिल्ह्य़ात दि. ८ सप्टेंबपर्यंत तब्बल ५२१ पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू होते. त्यानंतर मात्र सुरू झालेल्या परतीच्या पावसाने ही संख्य कमालीची घटली असून शुक्रवारपर्यंत यातील २४२ टँकर बंद झाले आहेत. मात्र जिल्ह्य़ात अजूनही २७९ टँकर सुरू असून २२५ गावे व ९९९ वाडय़ांमधील ५ लाख ४२ हजार ३९० लोकसंख्येला हा पाणीपुरवठा सुरू आहे.
शुक्रवारी नगरकरांचा दिवसच मुसळधार पावसात सुरू झाला. शहर व परिसरात गुरुवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला. तासभर थांबल्यानंतर पुन्हा पहाटे ६ वाजता सुरू झालेला मुसळधार पाऊस नऊ वाजेपर्यंत या पावसाने शहर धुऊन काढले. मुसळधार पावसामुळे शहरातील सर्वच रस्त्यांना नदीचे स्वरूप आहे होते. विशेषत: सखल भागातून तर मोठय़ाच प्रमाणात पाणी वाहत होते. सुमारे दोन तासानंतर पावसाचा वेग मंदावला तरी दुपारी चारपर्यंत शहर व परिसरात मध्यम संततधार सुरूच होती. पहाटेपासुनच काळेकुट्ट ढग बरसत राहिल्याने शुक्रवारी सूर्यदर्शन तर झालेच नाही, शिवाय संततधारेमुळे दिवसभर कुंद वातावरण होते. या पावसाने शालेय विद्यार्थ्यांची चांगलीच तारांबळ उडाली.
शुक्रवारी सकाळी ८ वाजेपर्यंत झालेल्या जिल्ह्य़ातील पावसाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. यातील पहिले आकडे आजच्या पावसाचे, दुसरे आकडे आत्तापर्यंतच्या पावसाचे असून दोन्ही आकडे मिलिमीटरमध्ये आहेत. कंसातील आकडे टक्केवारीचे आहेत. अकोले: १०-७०७ (१४३.३४), संगमनेर: २०-१८० (४३.२१), कोपरगाव: २८-३०४ (६९.४), राहाता: १९-२३४ (५३.३२), श्रीरामपूर: २७-२७१ (५७.७८), राहुरी: २२-२३१ (४८.७८), नेवासे: २७-४०० (७५.२९), नगर: ४-३४५ (६५.८०), शेवगाव: ३२.१-३२६ (५६.१८), पाथर्डी: २१-३४७ (६३), पारनेर: २-३५३ (७४.४९), कर्जत: ३-१९१ (३७.९२), श्रीगोंदे: ३-२६१ (५८.२०) आणि जामखेड: ३-२८४ (४५.३३).
पाथर्डीतील ८६ टँकर बंद
जिल्ह्य़ातील टँकरचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. कंसाबाहेरील संख्या सुरू असलेल्या टँकरची व कंसातील संख्या बंद झालेल्या टँकरची आहे. अकोले- टँकर नव्हते, संगमनेर- ३० (बंद नाही), कोपरगाव- १ (बंद नाही), श्रीरामपूर- टँकर नव्हते, राहुरी- टँकर नव्हते, नेवासे- ४७ (बंद नाही), राहाता- ३ (बंद नाही), नगर- ३५ (१४), पारनेर- ४३ (३७), पाथर्डी- १५ (८६), शेवगाव- ४२ (१४), कर्जत- २७ (२९), जामखेड- १५ (२४) आणि श्रगोंदे- ३ (२४).
महिलेसह ११ जनावरे दगावली
गेल्या दहा दिवसांतील पावसाबरोबरच जिल्ह्य़ात वीज कोसळण्याचे प्रमाणही वाढले आहे. वीज व वादळी पावसाने एका महिलेसह ४ मोठी व ११ लहान जनावरांचा मृत्यू झाला. अरणगाव (जामखेड) येथील भामाबाई सहादु नन्नवरे (वय ७०) या वृद्धेचा मृत्यू झाला. जामखेडसह पारनेर, राहुरी, संगमनेर अकोले तालुक्यात जनावरांचे वीज कोसळून मृत्यू ओढावले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 19, 2015 4:00 am

Web Title: more than 242 tanker close in nine days due to rain
टॅग Tanker
Next Stories
1 नाशिकच्या पावसाने गोदावरी वाहती
2 पाणी योजनांची त्रयस्थ यंत्रणेमार्फत चौकशी
3 राज्यात सरींवर सरी, धरणांच्या पाणीपातळीत वाढ
Just Now!
X