हिंगोली : करोना कहर वाढल्याने मृताच्या अंत्यसंस्कारा वेळी हजर राहण्याचे प्रमाण हळूहळू कमी होऊ लागले आहे. करोनाकाळात २५ हून अधिक मृतदेहांवर नगरपालिका कर्मचाऱ्यांनीच अंत्यसंस्कार केले.

अंत्यसंस्काराच्या शेवटच्या क्षणापर्यंत कोणी नातेवाईक येतात काय, याची कर्मचारी वाट पाहतात. पण ते आले नाहीत तर मृताचा अंत्यविधी उरकून घेतात. नगरपालिकेने माधव सुकते, नवनाथ ठोंबरे, काशीनाथ लगड, चेतन बुजगावणे, अशोक गालफाडे, रवी गायकवाड, दिनकर शिंदे आदी कर्मचाऱ्यांना अंत्यविधीसाठी नियुक्त केले आहे. या  कर्मचाऱ्यांना पीपीई (पर्सनल प्रोटेक्शन कीट) संच परिधान करण्यास सांगितले जाते. अंत्यविधी उरकला की पीपीई किटही जाळून टाकण्यात येते. परत नव्याने स्वसंरक्षणासाठी किट उपलब्ध करून दिला जातो. शासनाने अंत्यविधी दरम्यान नातेवाइकांची गर्दी होऊ नये म्हणून कडक सूचना दिलेल्या आहेत. अंत्यविधीच्या ठिकाणी केवळ पाच व्यक्तींनीच उपस्थित राहावे. मृताचे नातेवाईक येत नसल्याने आतापर्यंत २५ जणांवर कर्मचाऱ्यांनी अंत्यसंस्कार केले आहेत.