प्रबोध देशपांडे

गेल्या वर्षभरात अकोला जिल्ह्यात ३० हजारांहून अधिक करोनाबाधित आढळून आले, तर ५०० पेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात ३१ ते ४० दरम्यानचे सर्वाधिक रुग्ण आढळून आल्याने या वयोगटात करोनाचा अधिक धोका असल्याचे स्पष्ट होते. जिल्ह्यात मार्च महिन्यात करोनाचा उद्रेक होऊन तब्बल १२ हजार ६७३ नवे रुग्ण आढळून आले. प्रशासनाकडून विविध उपाययोजना करूनही वाढती रुग्णसंख्या व मृत्यूचे प्रमाणात चिंताजनक ठरत आहे.

अकोला जिल्ह्यात ७ एप्रिल २०२० ला करोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. सुरुवातीच्या काळात कठोर निर्बंध व उपाययोजनांमुळे रुग्ण संख्या नियंत्रणात होती. जुलैपासून रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत गेली. ऑक्टोबर महिन्यांपासून जिल्ह्यातील करोनाबाधितांच्या संख्येवर काही प्रमाणात नियंत्रण आले होते. प्रशासनाकडून निर्बंध व उपाययोजनांमध्ये ढिलाई झाली. नागरिकांनीही काळजी घेण्यात बेजबाबदारपणा केल्याने करोना प्रादुर्भाव पुन्हा झपाट्याने वाढला आहे. गेल्या वर्षभराचा आढावा घेतला असता एप्रिल २०२० मध्ये सर्वात कमी २८ रुग्ण आढळून आले, तर सर्वाधिक मार्च २०२१ मध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेत १२ हजार ६७३ जणांना करोनाची बाधा झाली. फेब्रुवारी महिन्यात सुद्धा ५ हजार ०३७ जण बाधित झाले. त्या अगोदर गेल्या वर्षामध्ये सप्टेंबर महिन्यात ३ हजार ७०३ रुग्ण आढळून आले होते. या वर्षात गेल्या दोन महिन्यांमध्ये करोनाच्या संख्येने नवे उच्चांक गाठले आहेत. त्यामुळे ४ एप्रिलपर्यंत करोनाबाधितांचा आकडा ३० हजार ६५३ वर गेला, तर ४९९ रुग्णांचे मृत्यू झालेत. आतापर्यंतचे सर्वाधिक ९९ मृत्यू सप्टेंबर महिन्यांत नोंदविण्यात आले. त्या खालोखाल ८४ रुग्णांचे मार्च महिन्यांत करोनामुळे प्राण गेले. जिल्ह्यात सध्या १.६२ टक्के मृत्युदर आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये मृत्युदर घसरल्याने आरोग्य विभागाला दिलासा मिळाला. जिल्ह्यातील २६ हजार २७५ म्हणजेच ८५.७२ टक्के रुग्ण करोनातून बरे झाले असून १२.६५ टक्के सक्रिय रुग्ण आहेत. अकोला जिल्ह्यातील महापालिका क्षेत्रात सर्वाधिक ६२.४८ टक्के बाधा झाली. तालुकास्तरावरील शहरी भागांमध्ये १६.४५, तर २१.०७ टक्के रुग्ण ग्रामीण भागात आढळून आले आहेत.

* अकोला जिल्ह्यातील करोनाबाधितांची वयानुसार विभागणी केली असता ३१ ते ४० वयोगटात सर्वात जास्त बाधित आढळून आले.

* करोनाबाधितांमध्ये महिलांपेक्षा पुरुषांचे प्रमाण अधिक आहे. ३१ ते ४० वयोगटातील ६ हजार १३३ करोनाबाधित असून त्यात पुरुष ४ हजार २३०, तर १ हजार ९०३ महिलांचा समावेश आहे.

* पाच वर्षांच्या आतील २०८ लहान मुलांनाही करोनाने ग्रासले होते.

* ५ ते १० वयोगटातील ५२१, ११ ते २० वयोगटातील २ हजार ०२७, २१ ते ३० मधील ५ हजार ७३३, ४१ ते ५० वयातील ५ हजार ७३२, ५१ ते ६० मधील ४ हजार ९४७ आणि ६० वर्षांवरील ४ हजार ९५२ रुग्ण आढळून आले आहेत.

* वयानुसार करोनाबाधितांच्या मृत्यूचा विचार केल्यास सर्वाधिक ३०१ मृत्यू ६० वर्षावरील रुग्णांचे झाले. ५१ ते ६० मधील १०७, ४१ ते ५० वयातील ५४, ३१ ते ४० वयोगटातील २२, २१ ते ३० मधील १२ व ११ ते २० वयामधील एक रुग्णाचा जीव गेला आहे.

* गेल्या वर्षभरात करोना संकटामुळे आरोग्य विभागावर अतिरिक्त ताण राहीला. अपुरे मनुष्यबळ व अनेक समस्यांसह त्यांचा करोनाविरोधात लढा सुरूच आहे. वर्षभराच्या कालावधीमध्ये करोना परिस्थिती नियंत्रणात येण्याऐवजी ती अधिक चिघळल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. करोना संकटावर मात करण्यासाठी आता सामूहिक प्रयत्नांची गरज निर्माण झाली आहे.

एकूण तपासणींच्या  १३.४० टक्के बाधित

जिल्ह्यातील २ लाख २८ हजार ७४१ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ४ एप्रिलपर्यंत ३० हजार ६५३ म्हणजे १३.४० टक्के बाधित आढळले. संपर्कातील व्यक्तींचे प्रमाण १०.३० आहे. त्यामध्ये अतिजोखीम २.७६, तर कमी जोखीमचे प्रमाण ७.५४ आहे.