६८ तालुक्यांमध्ये भूजल पातळीत एक मीटरहून अधिक घट

मोहन अटाळकर, अमरावती</strong>

Water Storage, Amravati Division, Dams, Drops, 51 percent, Adequate Rainfall,
चिंता वाढली; अमरावती विभागातील धरणांमध्‍ये ५१ टक्‍के पाणीसाठा
Voting facility for Mumbai Thane Pune residents only in societies Pune news
मुंबई, ठाणे, पुणेकरांना सोसायट्यांमध्येच मतदानाची सोय
dcm ajit pawar announced construction of aims in pune in Interim budget
पुण्यात ‘एम्स’ उभे राहणार! अजित पवारांची मोठी घोषणा
Unseasonal rain Washim
वाशिममध्ये अवकाळी पाऊस, गारपीट; हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने बळीराजा हवालदिल

पाण्याच्या प्रचंड उपशामुळे विदर्भातील ‘अतिशोषित’ बनलेल्या शेकडो गावांसह यंदा ६८ तालुक्यांमध्ये सरासरी भूजल पातळीच्या तुलनेत यंदा ऑक्टोबरच्या भूजल पातळीत एक मीटरपेक्षा जास्त घट आढळून आल्यामुळे  या तालुक्यांमधील ३ हजार ४०८ गावांमध्ये गंभीर जलसंकटाची शक्यता आहे.

नव्या दुष्काळ व्यवस्थापन संहितेनुसार राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रामुख्याने पर्जन्यमान, वनस्पती निर्देशांक, मृदू आद्र्रता निर्देशांक, जलविषयक निर्देशांक यासोबत पिकांचे क्षेत्रीय सर्वेक्षण विचारात घेतल्या जाते. त्यानुसार राज्याच्या ३३ जिल्ह्यांमधील ३५१ तालुक्यातील भूजल पातळीचे निरीक्षण विहिरीतील पातळीच्या आधारे निरीक्षण करण्यात आले. यातून विदर्भातील ६८ तालुक्यांमध्ये गंभीर चित्र दिसून आले आहे.

यंदाच्या पावसाळ्यात अमरावती विभागात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत ७७८ मिमी पाऊस अपेक्षित असताना, प्रत्यक्षात ६६३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. ही टक्केवारी ८५ आहे. अकोला व वाशिम जिल्ह्याने सरासरी पार केली असली तरी अमरावती जिल्ह्यात ७७ टक्के, यवतमाळ ७८, व बुलडाणा जिल्’ात ६९ टक्के पाऊस पडला. कमी पावसामुळे ३९ तालुक्यांतील भूजलात १ मीटरहून अधिक घट झाली आहे. या तालुक्यांमध्ये भूजलाचे पुनर्भरण झालेलेच नाही. मात्र, २१ तालुक्यांतील भूजलात १० फुटांपर्यंत वाढ झाल्याचे निरीक्षण विहिरीतील स्थिर पाणीपातळीच्या नोंदीवरून स्पष्ट झाले आहे.

भूजल सर्वेक्षण विभागाच्या माहितीनुसार, भूजल पातळीत विभागातील ५६ पैकी आठ तालुक्यांमध्ये एक मीटपर्यंत, १९ तालुक्यांमध्ये दोन मीटपर्यंत, सात तालुक्यांमध्ये तीन मीटपर्यंत तसेच एका तालुक्यात तीन मीटरपेक्षा जास्त घट आलेली आहे. जिल्हानिहाय अमरावती जिल्ह्यात १२, अकोला जिल्ह्यात ७, वाशिम जिल्ह्यात १, बुलडाणा जिल्ह्यात १३, तर यवतमाळ जिल्ह्यात दोन तालुक्यांतील भूजलात तूट नोंदविली गेली.

नागपूर विभागातील एकूण २९ तालुक्यांमध्ये भूजल पातळीत घट आढळून  आली आहे. त्यात नागपूर जिल्ह्यातील ७, वर्धा जिल्ह्यातील ५, चंद्रपूर जिल्ह्यातील ११, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यातील प्रत्येकी ३ तालुक्यांचा समावेश आहे.

अमरावती विभागाची भूगर्भीय स्थिती पाहता, किमान ८२ टक्के भूभाग हा ‘बसाल्ट’ या कठीण या खडकाने व्यापला आहे. यात पाणीसाठवण क्षमता कमी आहे; मात्र यात भेगा व सांधे निर्माण झाल्याने थोडीफार साठवण होते. भूपृष्ठीय रचना व भूगर्भीय स्थितीवर झालेल्या पर्जन्यमानाचे भूजलात रूपांतर होणे महत्त्वाचे आहे. मात्र, सिंचन, औद्य्ोगिक वापर, शहरीकरण व वाढत्या लोकसंख्येसाठी पाण्याची मागणी यामुळे या साठय़ातून भूजलाचा वारेमाप उपसा होत आहे.

नवीन भुजल कायद्यानुसार बोअरवेल्सची खोली ही २०० फुटांपेक्षा अधिक नसावी, हे बंधन आहे. पण विभागात १ हजार फुटांपेक्षा अधिक खोलवर बोअरवेल घेण्याचे काम राजरोसपणे सुरू आहे.

अतिशोषित भागात नवीन बोअरवेल्स आणि विहिरी खोदण्यास बंदी असली, तरी उपलब्ध असलेल्या बोअर आणि विहिरींमधून पाण्याचा प्रचंड उपसा सुरूच आहे. भूजलाच्या पाण्याची पातळी वाढावी यासाठी कोल्हापुरी बंधारे, पाझर तलाव, ढाळीचे बांध, नाला खोलीकरण, विहीर पुनर्भरण योजना, रेन वॉटर हार्वेस्टिंग यासारखे प्रयोग राबवण्यात येत असले, तरी या कामांवरही मर्यादा आल्या आहेत. पंतप्रधान पॅकेज अंतर्गत विदर्भात हजारो चेकडॅम बांधण्यात आले. जलसंधारणासाठी उपयोगी ठरू शकणाऱ्या या चेकडॅम्सचा फायदा भूजल पुनर्भरणासाठी होईल, अशी आशा व्यक्त केली जात होती, पण प्रत्यक्षात मात्र बहुसंख्य चेकडॅम गाळाने भरले आणि पुनर्भरणाचे मुख्य कामच ठप्प पडल्याचे दिसून आले.

नव्या बंधाऱ्यांचे काम त्वरेने हाती घेतले जाते, पण जुन्या बंधाऱ्यांकडे दुर्लक्ष होत असल्याची सार्वत्रिक ओरड आहे. जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांवर आतापर्यंत कोटय़वधी रुपयांचा खर्च झालेला असताना भुजल पुनर्भरणाला अपेक्षित यश का मिळू शकले नाही, हे या भागातील शेतकऱ्यांसाठी कोडे ठरले आहे.

भूजलाच्या पुनर्भरणासाठी जनजागृती आवश्यक असताना नेमके याकडे होणारे दुर्लक्ष भुजलाच्या मुळाशी आले आहे. पाण्याचा प्रचंड प्रमाणात होणारा उपसा या भागात न थांबल्यास आणि पुनर्भरणाकडे लक्ष न दिल्यास भविष्यात मोठे संकट निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

* अमरावती विभागातील सुमारे २ हजार ४७२ गावांमध्ये भूजल पातळीत एक मीटरपेक्षा जास्त घट दिसून आली आहे. त्यात बुलढाणा जिल्ह्यातील सर्वाधिक १ हजार १८ गावांचा समावेश आहे. त्याखालोखाल अमरावती जिल्ह्यातील ९७७, अकोला जिल्ह्यातील ३८४, यवतमाळ जिल्ह्यातील ८९ आणि वाशिम जिल्ह्यातील ४ गावांचा समावेश आहे.

* नागपूर विभागातील ९३६ गावांमध्ये भूजल पातळी १ मीटरपेक्षा जास्त खालावली. नागपूर जिल्ह्यातील सर्वाधिक ५१९ गावांमध्ये ही घट दिसून आली आहे. वर्धा जिल्ह्यातील १९२, चंद्रपूर जिल्ह्यातील १६५, गडचिरोली जिल्ह्यातील ४६ आणि गोंदिया जिल्ह्यातील १४ गावांमध्ये भूजल पातळीत घट नोंदवण्यात आली आहे. भंडारा जिल्ह्यात एकाही गावात घट झालेली नाही.

* विदर्भातील ५६६ गावांमध्ये भूजल पातळीत ३ मीटरहून अधिक घट दिसून आली आहे, हे चित्र भीषणता दर्शवणारे आहे. त्यात अमरावती विभागातील तब्बल ५४१ गावांचा समावेश आहे. ६५१ गावांमध्ये दोन ते तीन मीटर, तर २ हजार १९१ गावांमध्ये एक ते दोन मीटरची घट नोंदवण्यात आली आहे.

* भुजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या अहवालानुसार सरासरी पर्जन्यमानाच्या तुलनेत सप्टेंबर अखेर विदर्भातील ३४ तालुक्यांमध्ये २० टक्क्यांपर्यंत पावसाची तूट दिसून आली आहे. उर्वरित ३४ तालुक्यांमध्ये २० ते ३० टक्के तर २७ तालुक्यांमध्ये ३० ते ५० टक्क्यांची तूट आहे.