महाराष्ट्रात आज घडीला ४ लाखांहून जास्त रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली आहे.
महाराष्ट्रात मागील २४ तासांमध्ये १२ हजार ६०८ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर ३६४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. १० हजार ४८४ रुग्ण मागील २४ तासांमध्ये करोनामुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत महाराष्ट्रात करोनाची बाधा झालेल्यांची संख्या ५ लाख ७२ हजार ७३४ इतकी झाली आहे. यापैकी ४ लाख १ हजार ४४२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर महाराष्ट्रात सध्याच्या घडीला १ लाख ५१ हजार ५५५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आत्तापर्यंत करोनाची बाधा होऊन १९ हजार ४२७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३० लाख ४५ हजार ८५ नमुन्यांपैकी ५ लाख ७२ हजार ७३४ नमुने पॉझिटिव्ह (१८.८ टक्के) आले आहेत. राज्यात १० लाख ३२ हजार १०५ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३७ हजार ३८६ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यात आज ३६४ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.३९ टक्के एवढा आहे.

आज नोंद झालेल्या एकूण ३६४ मृत्यूंपैकी २७७ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ४६ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ४१ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ४१ मृत्यू ठाणे जिल्हा –१६, सांगली -७, पुणे -६, रायगड -३, बीड -२, कोल्हापूर -१, नागपूर -१, रत्नागिरी -१ सोलापूर – १, जळगाव -१, लातूर -१ आणि नाशिक -१असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे. ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारी नुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.