दिवसभरात २५ नवीन रुग्णांची भर

नगर : नगर जिल्ह्य़ात रविवारी  करोनाचे १३ तर शहरात १२ रुग्ण आढळून आले असून एकूण २५ रुग्णांची भर पडली आहे. नगर शहरात तोफखाना ५, ढवण वस्ती १, पाइपलाइन  व पद्मानगर १, आडते बाजार ५, भिंगार १ या प्रमाणे रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. सत्तर जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून  बरे झालेल्या रुग्णांची संख्या २८३ आहे. जिल्ह्य़ात रविवारी १० रुग्णांनी करोनावर मात केली. जिल्ह्य़ात आतापर्यंत एकूण ४२२ रुग्णांची नोंद झाली असून मृतांची संख्या १४ आहे. अ‍ॅक्टिव रुग्णांची संख्या १२५ आहे.  नगर शहर व संगमनेर हे करोनाचे हॉटस्पॉट ठरले असून करोना अद्यापही नियंत्रणात येत नसल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.

नगर शहरात सिद्धार्थनगर, भिंगार, नवनागापूर व केडगावमध्ये करोनाचे रुग्ण आढळून आले. या पैकी केडगाव येथील रुग्ण ठाण्याहून आला होता. नगर शहराच्या नालेगाव, अडतेबाजार, तारकपूर, तोफखाना या मध्यवर्ती भागात करोनाचे रुग्ण आढळून आले. त्यामुळे हा भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. शहरात सुरुवातीला मुकुंदनगर व आलमगीर भागात नवी दिल्लीतील निजामुद्दीन भागातील मरकजच्या कार्यक्रमावरुन आलेल्या नागरिकांमुळे करोनाचा प्रसार झाला होता. टाळेबंदीच्या काटेकोर अंमलबजावणीमुळे करोनाचा प्रसार थांबविण्यात प्रशासनाला यश आले. मात्र टाळेबंदी उठविल्यानंतर आता मुंबई, पुणे, ठाणे या भागातून आलेल्या नागरिकांमुळे करोनाचे रुग्ण आढळून आले. त्यांच्या संपर्कामुळे बाहेर न गेलेल्या स्थानिकांनाही करोनाची बाधा झाली आहे. करोना नियंत्रित येण्याऐवजी तो वाढत चालला असून त्यामुळे चिंता वाढली आहे.

संगमनेर शहरातही करोनाचा कहर थांबलेला नाही. संगमनेर तालुक्यातील कुरण येथे दोन, पिंपरणे व साकुर येथे प्रत्येकी एक, संगमनेर शहरातील हुसेननगर व लखमीपुरा येथे एक बाधित रुग्ण आढळून आले. संगमनेर व नगर या दोन शहरातच करोनाचे सुमारे ८० टक्के रुग्ण आहेत. त्याखेरीज अकोले, पारनेर तालुक्यातील गोरेगाव व अकोले शहरातील कांदा मार्केट येथे प्रत्येकी एक बाधित रुग्ण आढळून आले. जिल्ह्यात करोनाच्या रुग्णाने चारशेची संख्या पार केली आहे. तर २८३ रुग्ण बरे झाले आहेत.

आज दहा रुग्णांनी करोनावर मात केली. त्यांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे आता ११३ रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. आज सरकारी रुग्णालयाच्या करोना तपासणी प्रयोगशाळेत ७० व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले. त्यामुळेही प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला.

करोना नियंत्रणात येईल, आरोग्य विभागाचा दावा

नगर शहर व संगमनेरमध्ये करोनाचे रुग्ण मोठय़ा प्रमाणात वाढले. पण आता प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांमुळे करोना नियंत्रणात येणार आहे. संगमनेर येथे प्रत्येक घरी आरोग्य सर्वेक्षण केले जात आहे. लोकांमध्ये सामाजिक संपर्कामुळे करोना होतो याचे भान व गांभीर्य आले आहे. नगर शहरात प्रतिबंधित क्षेत्रात कठोर उपाययोजना केल्या जात आहेत. लोकांनी शिस्तीचे पालन केले, सामाजिक अंतर राखले, मास्कचा वापर केला तर करोना नियंत्रणात येण्यास मदत होईल.

—डॉ. बापूसाहेब गाडे, नोडल अधिकारी.