उथळ भागात सहजगत्या खाद्य उपलब्धता, शांततेचा परिणाम

पालघर : उथळ भाग, पाणथळ जागी तसेच खाडी भागात पक्ष्यांना सहजरीत्या उपलब्ध होणारे खाद्य आणि शांतता या वैशिष्टय़ांमुळे परदेशी पक्ष्यांना पालघर किनाऱ्याने भुरळ घातली आहे.

जिल्ह्य़ात वेगवेगळ्या हंगामांत किमान ४०० हून अधिक प्रजातींच्या पक्ष्यांचा वावर दिसून येतो. त्यामुळे जिल्ह्यातील समुद्रकिनारा हा निसर्गप्रेमी आणि पक्षी निरीक्षणासाठी पर्यटकांनी अधिक पसंती दिली आहे.

किनाऱ्याचा बहुतांश भाग हा खडकाळ आहे. माशांना बीजोत्पादनाला हा भाग अनुकूल समजला जातो. त्यामुळे या भागांत प्रजननासाठी माशांची संख्या वाढलेली असते. याशिवाय खडकाळ भागात लहान खेकडे, शिंपल्या, खुबे हे आढळून येतात. काही भागांत चिखल असल्याने त्यातील छोटे मासे आणि इतर लहान समुद्री जीव  हे पक्ष्यांसाठी मुबलक अन्न असते.  जिल्ह्यातील वसईपासून ते झाई-बोर्डी या किनाऱ्यांवर पक्ष्यांसाठी मोठय़ा प्रमाणावर अधिवास आहे.

जिल्ह्यातील दातिवरे, नांदगाव, दांडी, उनभात, चिंचणी, वरोर ,वाढवन, बोर्डी आणि झाई या किनारपट्टी भागांत मनुष्यवावर कमी असल्याने अशा कमी रहदारीचा भागांत हे पक्षी येथे ऑगस्टपासून दिसायला सुरुवात होते. यापैकी दातिवरे आणि वाढवण किनाऱ्यावर असे पक्षी हमखास दिसत असतात. सुमारे ४० हून अधिक पक्ष्यांचा किनाऱ्यांवर वावर आढळून येत आहे. त्यापैकी काही पक्षी हे विणीच्या हंगामात त्यांच्या घरटय़ांसह दिसून आले आहेत. निलकंठ, रंगीत करकोचा, आशियाई मुग्धबलाक, तांबडय़ा छातीची हरोळी, कलहंस, नीलिमा, नवरंग, काळ्या डोक्याचा खंडय़ा, हळदीकुंकू बदक, नकेर, चातक, लाल कंठाची तिरचिमणी, चिंबोरी खाऊ, रेड नेक फॅलेरोप, पलास गल, उलटचोच तुतारी, सफेद मोठा कलहंस, रंगीत तुतारी, ग्रे-प्लॉव्हर, रिंग-प्लॉव्हर, कास्पियन प्लॉव्हर, ग्रेट क्नोट, ग्रेटर क्रेस्टेड टन, कॅस्पिन टन यांसारखे इतर समुद्रपक्षी आणि पाणथळ भागांत दिसून येतात.

पक्षी निरीक्षक आशीष बाबरे हे गेली सात वर्षे पक्षीनिरीक्षण करत आहेत. त्यांना प्रवीण बाबरे, भावेश बाबरे, शैलेश अंब्रे, सत्यजित जोशी तसेच पालघरमधील प्रीतम घरत, श्रीधर गावाणे हे जखमी पक्ष्यांना वन विभागाकडे सुपूर्द करून त्यांच्यावर योग्य उपचार करून त्यांना पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्याचे काम करीत आहेत.