आघाडीतील 50 पेक्षा अधिक आमदार आमच्या संपर्कात असल्याचा गोप्यस्फोट जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केला. सध्या कोणीही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्यास उत्सुक नाहीत. अनेकांची पक्षावरील निष्ठा संपत चालली आहे. आघाडीचे अनेक दिग्गज नेते आपल्या पदाचा राजीनामा देत आहेत आणि भाजपात प्रवेश करत आहे. सध्या अनेक आमदार आपल्या संपर्कात असून तेदेखील लवकरच भाजपात प्रवेश करतील, असे ते म्हणाले.

मंगळवारी कालिदास कोळंबकर, शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि वैभव पिचड यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे सुपूर्द केला. त्यावेळी त्यांच्यासोबत गिरीश महाजन हेदेखील उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते. सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि कार्यकर्ते हे पक्षाच्या कार्यशैलीला कंटाळले आहेत. तसेच अंतर्गत गटबाजीचाही फटका सर्वाना बसत आहे, असे महाजन यावेळी म्हणाले. तसेच युतीबाबत बोलताना विधानसभेला युती तोडणार नसल्याचे स्पष्टीकरणही त्यांनी यावेळी दिलेय

अनेकजण आज भाजपामध्ये येण्यास उत्सुक आहेत. आम्ही कोणत्याही आमदाराला कोणतेही आश्वासन दिले नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. जे भाजपात येत आहेत, त्यांना आपल्या विभागाची काळजी आहे. त्यामुळेच ते भाजपात येत आहेत. बुधवारी चार आमदार भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. दरम्यान, यामध्ये कालिदास कोळंबकर, संदिप नाईक, शिवेंद्रसिंहराजे भोसले वैभव पिचड हे उद्या भाजपामध्ये प्रवेश करण्याची शक्यता सध्या वर्तवण्यात येत आहे.

विधानसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादी काँग्रेसला अजून एक धक्का बसला असून सातारा-जावळी मतदारसंघाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. शिवेंद्रसिंहराजे भोसले भाजपात प्रवेश करण्याची शक्यता असून त्यांनी तसे स्पष्ट संकेत दिले आहेत. सोमवारी झालेल्या बैठकीत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी भाजपामध्ये प्रवेश करावा असा प्रस्ताव कार्यकर्त्यांनी मांडला होता. भाजपा प्रवेशाचा सर्व कार्यकर्त्यांनी आग्रह धरल्याने शिवेंद्रसिंहराजे यांनी कार्यकर्त्यांच्या विचाराचाच निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगत एकप्रकारे भाजपात प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट संकेतच दिले.