गेल्या काही दिवसांपासून राज्यातील करोनाबाधितांची संख्या पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी करोनाबाधितांच्या संख्येचा आलेख खाली आला असला तरी पुन्हा एकदा आता त्यात वाढ होताना दिसत आहे. दरम्यान, गेल्या चोवीस तासांत राज्यात ५ हजार ५४४ नव्या करोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर ८५ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. शनिवारच्या तुलनेत राज्यातील करोनाबाधितांच्या संख्येत थोडी घसरण पाहायला मिळाली.

गेल्या चोवीस तासांत राज्यात ५ हजार ५४४ नव्या करोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर ८५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. यानंतर राज्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता १८ लाख २० हजार ०५९ वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत १६ लाख ८० हजार ९२६ जणांनी करोनावर मात केली आहे. राज्यात सध्या ९० हजार ९९७ रुग्णांवर उपचार सुरू असून आतापर्यंत ४७ हजार ०७१ जणांना करोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली.

पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात २०० करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून १४२ जण करोनामुक्त झाले आहेत. त्याचबरोबर उपचारादरम्यान ४ जणांचा मृत्यू झाला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण बाधित रुग्णांची संख्या ९२ हजार १५९ वर पोहचली असून त्यापैकी ८८ हजार १७९ जणांनी करोनावर मात केली आहे, अशी माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.