X
X

चिंताजनक…! ११ महिन्यात मराठवाड्यात ८५५ शेतक-यांच्या आत्महत्या

READ IN APP

तब्बल २४० प्रकरणे अपात्र तर ८३ चौकशीसाठी प्रलंबित

मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्याचे सत्र थांबता थांबेना, रोगराई, पावसाच्या अभावामुळे घेतलेल्या पिकांचे होणारे नुकसान तसेच डोंक्यावरील वाढता कर्जाचा डोंगर, तसेच दुष्काळामुळे सततची नापाकी,  परिवाराची चिंता अशा अवस्थेत अडकलेल्या शेतक-यासमोर आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नसल्याचे दिसून येत आहे. जानेवारी ते नोव्हेबंर या अकरा महिन्यात मराठवाड्यातील तब्बल ८५५ शेतक-यांनी जिवन संपवल्याची आकडेवारी समोर आली आहे. शिवाय  प्रशासकीय स्तरावर ५३२ प्रकरणे पात्र तर २४० प्रकरणे अपात्र ठरली असून ८३ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहे.

अवर्षणग्रस्त मराठवाड्यात गेल्या चार ते पाच वर्षापासून पावसाची अनियमित्ता असल्याने शेतक-यांना मोठ्या अडचणीत सामना करावा लागत आहे. त्यातच यंदाही अत्यल्प पाऊस झाला असून विभागात दुष्काळ पडला आहे. त्यामुळे हजारो हेक्टर जमिनीवर घेतलेल्या पिकांचे पाण्याअभावी योग्य वाढ होत नसल्याने अपेक्षित उत्पन्न मिळत नाही, तसेच पिकांवर पडणा-या विविध रोगराईमुळे  पिकांसाठी बँका व सावकाराकडून घेतलेले कर्ज कसे फेडावे असा प्रश्न शेतक-यांना भेडसावत आहे.

राज्य सरकाने शेतक-यांचे दीड लाखापर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा केल्याने अनेक शेतक-यांना मोठा दिलासा मिळाला असला तरी जुन महिन्याच्या सुरवातीला पडलेल्या पावसाने काही प्रमाणात सुखावला होता. मात्र त्यानंतर पावसाने तब्बल दोन महिन्याची दांडी मारल्याने खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यानंतर विभागात सर्वञ दुष्काळ पसरला असून हाती येणारे पीक गेल्यामुळे शेतक-यांच्या चिंतेत मोठी भर पडत आहे.

माञ जानेवारी ते नोव्हेबंर या अकरा महिन्यात मराठवाडा महसूल विभागात प्राप्त झालेल्या आकडेवारी नुसार ८५५ शेतक-यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. यात जिल्हा समितीच्या वतीने करण्यात आलेल्या तपासणी मध्ये एकुण आत्महत्येच्या प्रकरणात ५३२ पात्र तर २४० प्रकरणे अपात्र ठरवली असून ८३ प्रकरणातील चौकशी प्रलंबित आहे, तर यातील ५२४ शेतकरी कुटूंबांना मदत देण्यात आली आहे.

विभागातील शेतकरी आत्महत्येची प्रकरणे

जिल्हा           प्रकरणे   पात्र    अपात्र       प्रलंबित

औरंगाबाद     १२८       ८१         २९          १८

जालना          ७१       ५९          ०९          ०३

परभणी         १२०       ७७         ३९         ०४

हिंगोली         ५७        ३२           १५          १०

नांदेड           ९१        ५२            ३४           ०५

बीड               १८०     १३४         १५            ३१

लातूर              ७६      ५४          १९           ०३

उस्मानाबाद      १३२     ४३          ८०          ०९

————————————————–

एकुण                 ८५५     ५३२        २४०        ८३

21
X