राज्यासह वसई-विरार शहराला करोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका बसला आहे. झपाट्याने होणाऱ्या रुग्णवाढीमुळे उपचाराधीन रुग्णांच्या आकडेवारीने साडेपाच हजारांचा टप्पा पार केला आहे. शहरात ५ हजार ७९२ रुग्ण उपचाराधीन आहेत.

एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून करोनाचा कहर सुरू आहे. दिवसाला सरासरी ५०० ते ६०० रुग्ण आढळून येत आहेत. अकरा दिवसांत शहरात ६ हजार १२ नवीन करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. १ एप्रिल रोजी शहरातील उपचाराधीन रुग्णांची संख्या केवळ २ हजार १६३ इतकी होती. मात्र दिवसागणिक होत असलेल्या रुग्णवाढीमुळे हीच संख्या ५ हजार ७९२ वर जाऊन पोहोचली आहे. म्हणजेच अकरा दिवसांत उपचाराधीन रुग्णसंख्येत ३ हजार ६२९ने वाढ झाली आहे. तर दुसरीकडे मृत्यू होणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही वाढ होऊ  लागली आहे. अकरा दिवसांत १८ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.