कौटुंबिक लागण होण्याचे प्रमाण जास्त

रत्नागिरी रत्नागिरी जिल्ह्यात शुक्रवारी, एकाच दिवसात तब्बल दोनशेहून जास्त करोनाबाधित रूग्ण आढळून आल्यामुळे काहीसे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र यामध्ये काही कुटुंबांमधील रूग्ण एकत्रितपणे बाधित झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे संख्या वाढली तरी ते सामूहिक संसर्गाचे चिन्ह  नसल्याचे स्पष्ट होत आहे.

करोनाचे रूग्ण शोधण्यासाठी सध्या  जिल्ह्यात सध्या आरटी—पीसीआर आणि अ‍ॅन्टीजेन, या दोन्ही प्रकारच्या चाचण्या केल्या जात आहेत. गेल्या शुक्रवारी अशा प्रकारे दिवसभरात झालेल्या चाचण्यांद्वारे मिळून, प्रत्येकी सुमारे शंभर, असे  एकूण विक्रमी २०७ नवीन बाधित रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे गेल्या पाच महिन्यांतील बाधितांची एकूण संख्या ४ हजार ७३६ झाली आहे. शुक्रवारी सापडलेल्या रुग्णांपैकी बहुसंख्य नेहमीप्रमाणे रत्नागिरी (५४) , खेड (३२) आणि चिपळूण (३०) तालुक्यातील आहेत. या वेळी त्यात संगमेश्वर तालुक्याचीही भर पडली असली तरी त्यापैकी ३०  रूग्ण फक्त तीन कुटुंबांमधील आहेत. तसेच, रत्नागिरी शहरातही एकाच कुटुंबातील २० जणांची चाचणी सकारात्मक असल्याचे तपासणीत पुढे आले आहे. शहातील मुख्य बाजारपेठेच्या जवळच असलेल्या एका आळीमधील हे कुटुंब आहे. गणेशोत्सवासाठी आलेल्या नातेवाईकांचा यात समावेश आहे.

दरम्यान, या आजाराने शक्रवारी खेड तालुक्यातील एका ८० वर्षांच्या पुरूषाचा करोनाने मृत्यू झाला. त्यामुळे एकुण मृतांची संख्या १४२ झाली आहे. गेल्या दोन दिवसात मृतांचे प्रमाण कमी मृत्यूदरही साडे तीन टक्कय़ावरून २.०९ टक्केवर आला.

या पार्श्वभूमीवर दिलासादायक बाब म्हणजे, शुक्रवारी एकाच दिवसात शंभरपेक्षा जास्त रूग्णांनी १०६ करोनावर मात केली आहे. चिपळूण तालुक्यातील पेढांबे येथील केंद्रातील सर्वांत जास्त, ६९ रुग्णांचा त्यामध्ये समावेश आहे. त्यामुळे गेल्या पाच महिन्यांतील करोनामुक्त रूग्णांची एकूण संख्या तीन हजारांवर (२ हजार ९७७)  पोचली आहे.