प्राचार्य, अधिव्याख्याता, प्राध्यापक व ग्रंथपालांची

नक्षलग्रस्त चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्य़ांच्या शैक्षणिक विकासासाठी सुरू केलेल्या गोंडवाना विद्यापीठात प्राचार्याची १६३, अधिव्याख्याता, प्राध्यापक व ग्रंथपाल अशी २ हजार ३२० पदे रिक्त आहेत. या विद्यापीठाला विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता नसल्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्य़ासाठी २०११ मध्ये गोंडवाना विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. या विद्यापीठांतर्गत एकूण २३७ महाविद्यालये असून, १७० महाविद्यालये कायम विनाअनुदान तत्वावर, तर ६७ महाविद्यालये अनुदानित आहेत. मात्र, १६३ महाविद्यालयांत प्राचार्याची पदे रिक्त असल्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. गोंडवाना विद्यापीठाच्या विव्दत परिषदेने २७ नोव्हेंबर २०१५ रोजी ज्या महाविद्यालयात नियमित प्राचार्य नियुक्त केले नाही तेथील विद्यार्थ्यांचे परीक्षेसाठी नामांकन करण्यात येऊ नये, असा ठराव संमत केला आहे. त्यामुळे आणखी अडचणी निर्माण होण्याची शकयता आहे. या विद्यापीठांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांसाठी २३७ पदे मंजूर आहेत. सध्या केवळ ५६ पदेच भरलेली असून १८१ पदे रिक्त आहेत. यात अनुदानित महाविद्यालयांमधील ६७ पदांपैकी ५१ पदे भरलेली आहे. १६ पदे रिक्त, तर कायम विनाअनुदानित महाविद्यालयातील १७० पदांपैकी केवळ ५ पदे भरलेली असून, १६५ पदे रिक्त आहेत, तसेच शारीरिक शिक्षक संचालकांची २०० पदे मंजूर असून त्यापैकी ५४ पदे भरलेली, तर १४६ पदे रिक्त आहेत. अधिव्याख्यातांची २ हजार ११ पदे रिक्त आहेत.

या विद्यापीठांतर्गत २३७ महाविद्यालयात ३ हजार ५८ अधिव्याख्यातांची पदे मंजूर आहेत. यापैकी १ हजार ४७ पदे भरलेली, तर २ हजार ११ पदे रिक्त आहेत. अनुदानित महाविद्यालयातील १ हजार २४५ मंजूर पदांपैकी ८२५ पदे भरलेली आहेत. ४२० पदे रिक्त आहेत, तर कायम विनाअनुदानित महाविद्यालयातील १ हजार ८१३ मंजूर अधिव्याख्यात्यांच्या पदांपैकी २२२ पदे भरलेली आहेत. १ हजार ५९१ पदे रिक्त आहेत. या महाविद्यालयात अनेक विषयांचे प्राध्यापक नाहीत.

चार वर्षांपासून मान्यतेविना

८० हजार विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या गोंडवाना विद्यापीठाला गेल्या चार वर्षांंपासून विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता मिळालेली नाही. पाच पदव्युत्तर अभ्यासक्रम, परीक्षा भवन, प्रशासकीय भवन, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, मुलामुलींचे वसतीगृह व इतर सुविधा नसल्यामुळे मान्यता मिळण्यास अडचण होत आहे. विद्यापीठासाठी २५० एकर जागा मागितलेली असतांना केवळ ५० एकर जागा देण्यात आली आहे.