News Flash

‘मोर्णा’च्या स्वच्छतेसाठी अकोल्यात एकतेचे दर्शन

भारतीय संस्कृती ही मुळातच जलसंस्कृती असल्याने बहुतांश शहरे नदीकाठावरच वसली आहेत.

नदी स्वच्छता अभियानाला लोकचळवळीचे स्वरूप; ‘नमामि गंगे’च्या धर्तीवर ‘मोर्णा स्वच्छता मिशन’

अकोल्याच्या मध्यवर्ती भागातून वाहणारी मोर्णा नदी म्हणजे शहराच्या वैभवाचे प्रतीक. गेल्या काही वर्षांमध्ये मात्र जलकुंभी आणि अस्वच्छतेमुळे मोर्णा नदीची विद्रूप अवस्था झाली. त्यामुळे ‘मोर्णामाय’ला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी लोकसहभागातून विशेष अभियान राबविण्यात येत आहे. या मोहिमेत सर्व लोकप्रतिनिधी, विविध राजकीय पक्षांचे नेते, अनेक स्वयंसेवी संघटना, शासकीय अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी व शहरातील नागरिक मोठय़ा हिरिरीने सहभागी झाले. या निमित्ताने विधायक कार्यात अकोलेकरांच्या एकतेचे दर्शन घडले. नदी स्वच्छता अभियानाचे दोन टप्पे यशस्वी झाल्यानंतर नदीकाठच्या विकासासाठी नियोजनबद्ध आराखडा तयार करण्यात आला असून, स्वच्छता अभियानाला लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

भारतीय संस्कृती ही मुळातच जलसंस्कृती असल्याने बहुतांश शहरे नदीकाठावरच वसली आहेत. शरीरातील रक्तवाहिन्याप्रमाणेच नद्यांचू जाळी कार्यरत असतात. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये पर्यावरणाचा ऱ्हास व बदलत्या हवामानामुळे जलस्रोत संकटात आले आहेत. पाण्याचे स्रोत वाढविणे, जलसंधारण, जलप्रक्रियासारखे अनेक उपाय शासनाने राबविले तरी त्याला मर्यादा येतात. त्यामुळे लोकसहभागातूनच नद्यांचे समृद्धीकरण शक्य असल्याची संकल्पना देशात पुढे आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी व जलसंवर्धनमंत्री नितीन गडकरी यांनी देशातील सर्व पवित्र नद्यांवर सामाजिक संघटना, उद्योजक यांच्या पुढाकाराने स्वच्छता अभियान राबविण्याचे निश्चित केले. ‘नमामि गंगे’च्या माध्यमातून नद्यांना स्वच्छ करण्याचा व नदी जोड अभियानाला सुरुवात केली आहे. या व्यापक कार्याला लोकसहभागाशिवाय पर्याय नाही. हे ओळखून अकोल्यात जिल्हा प्रशासनाच्या वतीने ‘मोर्णा स्वच्छता मिशन’ सुरू करण्यात आले.

मध्यवर्ती भागातून वाहणारी मोर्णा नदी शहराच्या सौंदर्यात भर घालणारी होती. बदलेले जीवनमान व पर्यावरणाचे असंतुलन यामुळे मोर्णेचा प्रवाह आटला. सोबतच नागरी वस्तीमधून येणाऱ्या दूषित पाण्यामुळे जलप्रदूषण झाले. नदी पात्रात मोठय़ा प्रमाणात जलकुंभी वाढली. परिणामी, नदीकाठच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले. महापालिकेकडून दर वर्षी लाखो रुपये खर्च करूनही नदी स्वच्छतेच्या कामात यश आले नाही. त्यामुळे दिवसेंदिवस मोर्णा नदीच्या अस्वच्छतेचा प्रश्न गंभीर होत असताना जिल्हा प्रशासनाच्या वतीने लोकसहभागातून अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याची संकल्पना जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी मांडली. मोर्णा नदीच्या स्वच्छतेसाठी पहिल्या टप्प्यात १३ जानेवारीला अकोलेकर एकवटले. पालकमंत्री, लोकप्रतिनिधी, विविध स्वयंसेवी संघटना व जिल्हा प्रशासनाच्या पुढाकाराने राबविलेल्या या विशेष अभियानात सुमारे सात हजार नागरिक सहभागी झाले. जलकुंभी व कचऱ्याने विद्रूप झालेल्या या नदीच्या स्वच्छतेच्या मोहिमेत पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, खासदार संजय धोत्रे, महापौर विजय अग्रवाल, आ. गोपीकिशन बाजोरिया, आ. गोवर्धन शर्मा, आ. रणधीर सावरकर, आ. हरीश पिंपळे, ज्येष्ठ कवी डॉ. विठ्ठल वाघ आदींसह वरिष्ठ अधिकारी, शंभरावर विविध सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था, कामगार, डॉक्टर, वकील संघटना, वाहतूक संघटना आदींसह विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित नागरिक, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिक सहभागी झाले. केवळ अकोला शहरातीलच नव्हे तर संपूर्ण जिल्हाभरातून अनेक जण पुढे आले. या अभियानात उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी समन्वयकाची भूमिका बजावली. दोन टप्प्यांत नदीकाठच्या परिसरात मोठय़ा प्रमाणावर स्वच्छता करण्यात आली आहे. मोहिमेसाठी आवश्यक असणारी साधने व साहित्य मनपाकडून पुरविण्यात आले. मोहिमेत सर्पमित्र पथक, वैद्यकीय सहायता पथक, पाणी व्यवस्थापन, साहित्यपुरवठा, जलकुंभी वाहतूक व्यवस्थापन, नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन पथक नदीकाठी तैनात करण्यात आले होते. ट्रॅक्टर वाहतूक संघटनेने वाहने, महामार्गाची कामे करणाऱ्या संघटनेने पोकलेन, सहा जेसीबी विनामूल्य उपलब्ध करून सामाजिक बांधिलकी जोपासली. जलकुंभी काढणारे विशेष कामगार या मोहिमेत स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले होते. विविध महाविद्यालयांतील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेत श्रमदान केले. अभियानात लोकप्रतिनिधी, अधिकारी, नागरिक यांनी उत्साहाने नदीपात्रातील कचरा बाहेर काढून स्वच्छतेचा संदेश दिला. मोर्णा नदीच्या स्वच्छतेसाठी सर्वानी एकजुटीने झटून एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. या अभियानामुळे जलकुंभी व अस्वच्छतेमुळे कोंडलेला मोर्णा नदीचा श्वास मोकळा झाला.

गटतट विसरून एकत्र

मोर्णा स्वच्छता अभियानात आपसी मतभेद विसरून अकोल्यातील राजकीय नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्र आल्याचे चित्र होते. अकोल्यात सर्वच पक्षांत गटबाजी आहे. सत्ताधारी भाजपमधील गटातटाचे राजकारण अनेक वेळा उफाळून येत असते. त्यामुळे नेते मंडळी एका व्यासपीठावर जाण्याचेही टाळतात. याचा विकास कार्याला जबर फटका बसतो. मोर्णा नदीच्या स्वच्छता अभियानात मात्र सर्व एकत्र श्रमदान करताना दिसून आले.

दर शनिवारी मोर्णाची स्वच्छता

अकोला शहरात मोर्णा स्वच्छता अभियान दर शनिवारी राबविले जाणार आहे. त्यामध्ये मोर्णा नदीची व नदीकाठच्या परिसराची स्वच्छता करण्यात येणार असून आतापर्यंत दोन टप्पे पार पडले आहेत. या अभियानात शंभरपेक्षा जास्त सामजिक संस्थांचाही सहभाग आहे. विविध संघटनांनी स्वच्छतेसाठी विनामूल्य वाहने, जेसीबी आणि जलकुंभी काढण्याचे यंत्र उपलब्ध करून दिल्याने अभियानाला गती प्राप्त झाली आहे. या अभियानाचे वर्षभराचे नियोजन करण्यात आले आहे.

सौंदर्यीकरणासाठी पुढाकार घेऊ

साबरमतीच्या धर्तीवर राजराजेश्वर नगरीतील मोर्णा नदीचे सौंदर्यीकरण करण्यात येईल. सोबतच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दिशेने केंद्र व राज्य सरकार सकारात्मक आहे. याला लवकरच मंजुरी मिळेल. लोकसहभाग, कर्तव्य, आपुलकीच्या भावनेतून राबविण्यात येणारी मोर्णा नदीची स्वच्छता मोहीम कौतुकास्पद आहे.

खासदार संजय धोत्रे, अकोला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2018 4:00 am

Web Title: morna river cleanliness campaign river cleanliness
Next Stories
1 भाजपाला घालवायचे असेल तर विरोधीपक्षातील मतविभाजन थांबवायला हवे – पृथ्वीराज चव्हाण
2 ग्रामीण भागातील सुप्त गुणवत्तेचा शोध!
3 ‘गरीबांना गरीब आणि श्रीमंतांना श्रीमंत करायचे ही भाजपची नीती’
Just Now!
X