धुळे भाजपामधील अंतर्गत संघर्ष शमण्याची चिन्हे नाहीत. आमदार अनिल गोटे यांना केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. तेलगीचे साथीदार आणि चार वर्षे तुरुंगात असताना तुम्हाला भाजपाने तिकीट दिलेच. तुम्हाला ‘पवित्र’ करुन निवडून आणले, असे नमूद करत त्यांनी अनिल गोटेंचा समाचार घेतला. भाजपात जातीयवाद चालत नाही याची अनेक उदाहरणे देता येतील. यातील एक उदाहरण म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस आहेत, असेही भामरे यांनी म्हटले आहे.

धुळे महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच भाजपामधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आला आहे. निवडणुकीची सूत्रे भाजपाने जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सोपविल्यापासून पक्षाचे स्थानिक आमदार अनिल गोटे नाराज आहेत. गोटे यांनी महाजन यांच्यासह संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्यावर तोफ डागण्याचा एककलमी कार्यक्रम हाती घेतला होता. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार अनिल गोटे यांना प्रत्युत्तर दिले.

मी उच्च शिक्षित असून वैद्यकीय शिक्षण घेतले आहे. यानंतर वैद्यकीय सेवा करतानाच मी समाज सेवेत झोकून दिले. आज वैद्यक क्षेत्रातील माझे मित्र महिन्याला कोट्यवधी रुपये कमावतात. मी समाजसेवेत नसतो तर मी देखील अशीच कमाई केली असती. पण जवळपास तीस वर्षे आपण केवळ सामान्यांची सेवा केली याचे हे फलित म्हणून लोकसभेचे तिकीट आणि केंद्रात मंत्रिपद मिळाले याची मला जाणीव आहे, असे त्यांनी सांगितले.

धुळेच्या विकासासाठी माझ्या कारकिर्दीत सर्वाधिक निधी आला. रेल्वे मार्गाच्या मागणीबाबतही सरकारने न्याय दिला. तेव्हापासूनच विरोधकांकडून माझा राग राग होतोय. खासदार म्हणून मी माझे काम केले ही काय चूक झाली का?, असा सवाल त्यांनी विचारला. भाजपात जातीयवाद नाही. मराठा आहे म्हणून पक्षाने तिकिट दिले नाही. धुळ्याच्या विकासासाठी मला संधी देण्यात आली. आवश्यक तेथे एखाद्या निष्ठवंतालाही पक्ष उमेदवारी देईल, असे त्यांनी सांगितले.

अनिल गोटेंचे नाव न घेता भामरे पुढे म्हणाले, तेलगीचे साथीदार आणि चार वर्षे तुरुंगात असताना तुम्हाला भाजपाने तिकीट दिले आणि समर्थनही केलेच. भाजपाने ‘तुम्हाला’ही पवित्र करून घेतले आणि मोदी लाटेवर आपण निवडून आलाच ना अशी आठवण भामरे यांनी यावेळी करून दिली. मी कधीही असा मोठेपणा मिरवला नाही. मंत्री झालो तरी मी पक्षापेक्षा मोठा नाही. या पक्षाने भल्याभल्यांना बाहेरची वाट दाखवली.पक्ष प्रभारीकडून निवडणूकपूर्व माहिती घेतली जाते. आवश्यक ते निर्णय घेतले जातात.ही पक्षाची कार्यद्धती असून ती मान्य करावी लागते, असे ते म्हणाले.

गोटेंची लढाई निष्ठावतांसाठी नाही तर स्वतःला महापौरपदी विराजमान होण्यासाठीची आहे. ते शांत राहिले असते तर धुळ्याचे प्रभारी तथा जलसंपदामंत्री गिरीष महाजन ‘त्यांच्या’ घरीही गेले असते. भाजपा निष्ठवंतांना टाळत नाही हा इतिहास आहे. महापालिका निवडणूक कार्यक्रमात मी कोण ढवळा ढवळ करणारा? असा प्रश्न उपस्थित करुन भामरे यांनी उमेदवारी वाटप निर्णय प्रक्रियेत आपण नाहीत, असे स्पष्ट केले.