अभिनेते नाना पाटेकरांवर आरोप करणाऱ्या तनुश्री दत्ताला राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकरांनी पाठिंबा दर्शवला. नाना पाटेकर हे फक्त प्रसिद्ध अभिनेते नाहीत. ते सामाजिक कार्यकर्ते आहेत. तनुश्रीने प्रसिद्धीपायी आरोप करण्याऐवजी आधी पोलिसांकडे तक्रार दाखल करावी’, असे केसरकरांनी म्हटले आहे.

तनुश्री दत्ताने काही दिवसांपूर्वी नाना पाटेकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. २००८ साली ‘ हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटादरम्यान नानांनी माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असभ्य वर्तन केले, असा आरोप तिने एका मुलाखतीत केला. यानंतर तनुश्री सातत्याने नाना पाटेकरांवर आरोप करत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तनुश्री दत्ताने पोलिसांकडे तक्रार करण्याऐवजी फक्त माध्यमांसमोरच नाना पाटेकरांवर आरोप करण्याच्या प्रकारावर त्यांनी नाराजी व्यक्त केली.

केसरकर म्हणाले, तनुश्री दत्ताने अगोदर पोलिसांकडे तक्रार दाखल करावी. फक्त प्रसिद्धीपायी माध्यमांसमोरच आरोप करणे चुकीचे आहे. तक्रार आल्यास पोलीस तपासाला सुरुवात होऊ शकेल. नाना पाटेकर हे फक्त प्रसिद्ध अभिनेते नाहीत. ते सामाजिक कार्यकर्तेसुद्धा आहेत. जर तनुश्रीने तक्रार दाखल केली तर आम्ही या प्रकरणाचा सखोल तपास करु. या गुन्ह्याचा निष्पक्ष तपास केला जाईल, असे केसरकरांनी सांगितले.

मनसे कार्यकर्त्यांकडून धमकी येत असल्याचे तनुश्रीने म्हटले होते. यावर केसरकर म्हणाले, मला याबाबत फार माहिती नाही. पण याला महत्त्व देण्याची गरज नाही. तनुश्रीने पुराव्यासह आमच्याकडे तक्रार दाखल केली तर पोलीस निष्पक्ष तपास करतील, असे आश्वासन त्यांनी दिले. कायदा सर्वांसाठी समान असून जर यात कोणी दोषी आढळले तर त्यांना कठोर शिक्षा होणारच, असेही त्यांनी नमूद केले. नाना पाटेकरसारख्या व्यक्तीवर असे आरोप करताना प्रत्येकाने आधी विचार केला पाहिजे. नाना पाटेकर यांचे सामाजिक कार्य सर्वांनाच माहित आहे. असा परिस्थितीत फक्त आरोप करणे अयोग्य असून जवळपास आठ वर्ष या प्रकरणाला वाचा का फोडली नाही, असा सवाल त्यांनी विचारला.