पालघर नगरपरिषदेची डास प्रतिबंधात्मक उपाययोजना फोल

पालघर : पालघरमध्ये नागरी वस्तीत डासांचा  वाढत्या प्रादूर्भाव पाहता  नगरपरिषदेची डास प्रतिबंधात्मक उपाययोजना फोल ठरत   असल्याचे  दिसत आहे. विविध प्रभागातील नागरिक वाढत्या डासांचा प्रादुर्भावामुळे हैराण झाले आहेत.

पालघर नगरपरिषद हद्दीतील उघडी गटारे, ठिकठिकाणी पडलेला कचरा, मासळी बाजारातील जैवयुक्त सांडपाणी, उघडे पाणवठे, वाढलेली झाडेझुडपे आदींमुळे या डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

नगरपरिषद लाखो रुपये खर्च करून डास प्रतिबंध औषध फवारणीसाठी जंतुनाशके खरेदी करत आहे. मात्र या फवारणीचा प्रभाव अगदी काही वेळ राहतो. नंतर पुन्हा डासांचा प्रादुर्भाव वाढतो. कधी तरी चुकून धूर यंत्र येऊन जाते पण त्याचाही उपयोग होताना दिसत नाही. करोनाचा आजार फैलू नये यासाठी मिळालेल्या मार्गदर्शक सूचना अनुषंगाने संपूर्ण जिल्हा प्रशासन त्याच्या अंमलबजावणीसाठी सज्ज असताना पालघर नगरपरिषद क्षेत्रात मात्र डासांचा प्रादुर्भावाकडे दुर्लक्ष केले जात आहे. गतवर्षी याच प्रादुर्भावामुळे डेंग्यूची लागण अनेकांना झाली होती. तर मलेरियाचे रुग्ण वाढले होते.  त्यामुळे डास निर्मूलनाबाबत उपाययोजना करावी अशी   मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.

नगरपरिषदेने ऑक्टोबर १९ ते जानेवारी या चार महिन्यांमध्ये स्वच्छता सफाईसाठी ६६ लाख ९५ हजार, गटार सफाईसाठी २५ लाख ६८ हजार, औषध फवारणीसाठी २० लाख ९८ हजार तर जंतुनाशके खरेदी करण्यासाठी पाच लाख १७ हजार इतका निधी खर्च केला. जानेवारीनंतरही औषध फवारणीसाठी लाखोंचा निधी खर्च केला गेला मात्र त्यानंतरही डासांचा प्रादुर्भाव कायम आहे, असे नागरिकांकडून सांगितले जाते.

प्रशासकीय यंत्रणा  फवारणी करताना दिसत नाही. फवारणीसाठी कर्मचारी कधीतरी परिसरात दिसतात. प्रत्येक वॉर्डात फवारणी करायला हवी. नगराध्यक्ष स्वत: डॉक्टर आहेत. नागरिकांची काळजी घेणे हे त्यांचे कर्तव्य आहे व ते त्यांनी पाळायला हवे. -शैलेश ठाकूर, नागरिक

 

धूर फवारणी नियमित सुरू आहे.ती वाढविण्याचा प्रयत्न करू. औषध फवारणीच्या वापरल्या जाणाऱ्या औषधाचे व पाण्याचे प्रमाण तपासण्यासाठी त्रयस्थ अधिकारी नेमला जाईल. -स्वाती देशपांडे-कुलकर्णी, मुख्याधिकारी