News Flash

पुणे विभागात सोलापूर जिल्ह्य़ात सर्वाधिक चारा छावण्या

सध्या सुरू असलेल्या चारा छावण्यामध्ये सांगोल्यात ८१ छावण्यांमध्ये ५३ हजार ६०६ जनावरे आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

पुणे विभागात दुष्काळाची सर्वाधिक दाहकता सोलापूर जिल्ह्य़ात जाणवत आहे. या विभागात मुक्या जनावरांना जगविण्यासाठी सर्वाधिक १५३ चारा छावण्या सोलापूर जिल्ह्य़ात आहेत. त्यापैकी १३७ चारा छावण्या प्रत्यक्षात सुरू झाल्या आहेत. यात ८३ हजार ६०३ जनावरे दाखल आहेत.

पुणे विभागात पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर व सोलापूर या पाच जिल्ह्य़ांपैकी पुणे, सांगली व कोल्हापूर जिल्ह्य़ात सध्या एकही चारा छावणी नाही. सातारा जिल्ह्य़ात सध्याच्या दुष्काळात २७ चारा छावण्या आहेत. त्यात १९ हजार ५६३ जनावरे दाखल आहेत. तर दुष्काळाने सर्वाधिक होरपळणाऱ्या एकटय़ा सोलापूर जिल्ह्य़ात सध्या १५३ चारा छावण्या मंजूर आहेत. त्यापैकी आतापर्यंत १३७ चारा छावण्या सुरू झाल्या आहेत. यात सांगोल्यात ८१, तर मंगळवेढय़ात ४३, करमाळ्यात ११ तर बार्शी तालुक्यात दोन चारा छावण्या सुरू झाल्या आहेत. एकूण सर्व चारा छावण्यांमध्ये मिळून ८३ हजार ६०३ एवढी जनावरे दाखल आहेत. मात्र उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, मोहोळ, पंढरपूर, माढा व माळशिरस या सात तालुक्यांमध्ये दुष्काळाची छाया गडद असूनदेखील सध्या एकही चारा छावणी सुरू झाली नाही. यातील माढा तालुक्यात चार चारा छावण्यांना मंजुरी मिळाली असली तरी अद्यापि एकही चारा छावणीला मुहूर्त लागला नाही.

सध्या सुरू असलेल्या चारा छावण्यामध्ये सांगोल्यात ८१ छावण्यांमध्ये ५३ हजार ६०६ जनावरे आहेत. तर मंगळवेढा तालुक्यातील ४३ चारा छावण्यांमध्ये २३ हजार २७५ जनावरे आहेत. जिल्ह्य़ातील एकूण जनावरांची संख्या विचारात घेता आणखी चारा छावण्या सुरू होण्याची मागणी पुढे येत आहे.

६०७ पैकी २२४ टंचाईग्रस्त गावांना टंँकरने पाणी

जिल्ह्य़ात भूजल सर्वेक्षण यंत्रणेने ऑक्टोबर ते जून या कालावधीत ६०७ गावांमध्ये टंचाई स्थितीचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर केला होता. त्यापैकी निम्म्यापेक्षा कमी म्हणजे केवळ २२४ टंचाईग्रस्त गावांना टंँकरने पाणीपुरवठा होत आहे. माढा तालुक्यातील ९७ आणि करमाळा तालुक्यातील ८८ गावांना पाणीटंचाईच्या झळा बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. माळशिरस-७८, सांगोला-४२, अक्कलकोट-६६, बार्शी-७५, मोहोळ-४९, पंढरपूर-४०, मंगळवेढा-२२, दक्षिण सोलापूर-४२ व उत्तर सोलापूर-८ याप्रमाणे गावनिहाय टंचाई स्थितीचा अंदाज आहे. दरम्यान, प्राप्त परिस्थितीत जिल्ह्य़ात चार लाख ८२ हजार लोकसंख्येच्या तहानलेल्या २२४ गावे आणि १४४४ वाडय़ा-वस्त्यांना २४९ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. सांगोल्यात ४३ गावांना ४८ टँकरने, तर मंगळवेढय़ात ४७ गावांना ५५ टँकरने पाण्याची तहान भागविली जात आहे. करमाळ्यातील ४५ गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी ४६ टँकर लागत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 15, 2019 12:51 am

Web Title: most fodder camps in solapur district
Next Stories
1 ‘अरे लाजा कशा वाटत नाही’, नवाब मलिक भाजपावर संतापले
2 ‘ईडी’ दणका, नागपूरमध्ये ४८३ कोटींचा मॉल जप्त
3 वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशाला आठवडभराची मुदतवाढ
Just Now!
X