नांदेड :  तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी पाकिस्तानला धडा शिकवला होता. तसेच इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानचा इतिहास नव्हे तर भूगोल बदलून टाकला होता, परंतु मोदी सरकारच्या काळात सर्वात जास्त दहशतवादी हल्ले झाले आहेत. या सरकारच्या कारभारामुळे देशाच्या सुरक्षाव्यवस्थेला तडा बसला आहे. ५५० कोटी रुपयांमध्ये खरेदी केलेले राफेल विमान मोदींनी साडेसोळाशे कोटींना खरेदी केले असून, राफेलचे भूत मोदी सरकारला गाडल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन माजी केंद्रीय संरक्षणमंत्री व राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार यांनी बुधवारी येथे केले. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाआघाडीच्या संयुक्त सभेस मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, काँग्रेसचे सहप्रभारी संपतकुमार, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदींची उपस्थिती होती.

या वेळी पवार म्हणाले, डॉ. शंकरराव चव्हाण यांनी व मी स्वत: देशाचे संरक्षणमंत्रिपद सांभाळले होते. आम्ही देशाच्या सुरक्षेला तडा जाईल, असे वर्तन कधीही केले नाही, परंतु मोदी सरकारकडून मात्र सुरक्षाव्यवस्थेला तडा दिला गेला आहे. राफेल विमान खरेदी व्यवहारावरून पवार यांनी मोदी यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल केला. पुलवामा हल्ला हा देशावरचे संकट आहे. अशा संकटावेळी आम्ही मतभेद विसरून एकीचे दर्शन घडवत सरकारच्या पाठीशी उभे राहिलो आहोत, परंतु हल्ला झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे धुळे व यवतमाळ येथील सभेत गुंतले होते. यावरूनच त्यांची असंवेदनशीलता दिसून आली आहे.

नोटबंदीनंतर आतंकवादी हल्ले कमी होतील असा दावा करण्यात आला होता, परंतु हल्ले कमी न होता वाढतच जात आहेत. भाजप सरकारच्या नोटबंदीमुळे देशाची अर्थव्यवस्था प्रभावित झाली असून गरिबांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे. जीएसटीमुळे व्यापारी अडचणीत आले असून या देशात शेतकरी, व्यापारी, सामान्य नागरिक कोणीच सुखी नाही. भाजप सरकारने दिलेले धनगर आरक्षणाचे आश्वासनही पूर्ण झालेले नाही. एकाही आश्वासनाची पूर्तता सरकारने केली नाही. त्यामुळे लबाडाचं आवतान जेवल्याशिवाय खरं नाही, असे सांगत खासदार पवार यांनी मोदी सरकारच्या कारभारावर टीका केली. या वेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, आमदार जोगेंद्र कवाडे, नसीम खान, धनंजय मुंडे, बसवराज पाटील, आमदार जयंत पाटील आदींची भाषणे झाली. सभेचे सूत्रसंचालन संतुका पांडागळे यांनी केले.

परिवर्तन घडवूया- अशोक चव्हाण</strong>

नांदेड हा शंकरराव चव्हाण यांच्या काळापासून काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला असून, येथील मतदारांनी काँग्रेसला नेहमीच साथ दिली आहे. गेल्या साडेचार वर्षांत सरकारने शेतकरी, बेरोजगार, व्यापारी, सर्वसामान्य जनता या सर्वाचीच फसवणूक केली आहे. शिवसेना-भाजप युतीतील नेते परस्परविरोधात ‘पटक देंगे, फेक देंगे’ अशी भाषा करीत आहेत. नीरव मोदी, विजय मल्यासारखे लोकपळून गेले, ही शोकांतिका आहे. आपल्याला फसवले गेले आहे, अशी भावना जनतेच्या मनात निर्माण झाली. या जुमलेबाज सरकारला सत्तेतून खाली खेचत परिवर्तन घडवा, असे आवाहन खासदार चव्हाण यांनी या वेळी केले.