सातारा लोकसभा मतदार संघासाठी आज विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह १८ उमेदवारांचे भवितव्य मतयंत्रात सीलबंद झाले. त्यात मतदानात कराड दक्षिणमध्ये उत्साहात सर्वाधिक सुमारे ५६ टक्के मतदान झाले आहे. मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत मतदानाची नेमकी आकडेवारी उपलब्ध होऊ शकली नाही. सकाळच्या सत्रात कराड दक्षिणेतील मतदान इतर पाच विधानसभेच्या मतदारसंघाच्या तुलनेत अगदीच ढेपळले होते. मात्र, मतदानाच्या अखेरच्या टप्प्यात हेच मतदान सातारा लोकसभा मतदारसंघातील सर्वाधिक मतदान ठरले.
कराड दक्षिणेत सकाळी ७ ते ९ या दोन तासांत केवळ ३.२१ टक्के मतदान नोंदले गेले होते. तर, याचवेळी कोरेगाव विधानसभा मतदारसंघात जवळपास ९ टक्के मतदान झाले होते. यानंतर ९ ते ११ वाजेपर्यंत प्रशासनाने जाहीर केलेल्या आकडेवारीत कराड दक्षिणचा टक्का घसरलेलाच होता. मात्र, मतदानाच्या सरतेशेवटी कराड दक्षिणच्या मतदारांनी मतदान प्रक्रियेत आघाडी घेतली. त्यात सातारा लोकसभा मतदारसंघातील कराड दक्षिणमध्ये सुमारे ५६ टक्के तर, पाठोपाठ नजीकच्या पाटण विधानसभा मतदारसंघात ५५ टक्के तसेच, सर्वात कमी सुमारे ४९ टक्के इतके मतदान वाई विधानसभा मतदारसंघात झाल्याचा अंदाज आहे.
तळपत्या उन्हातही मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्यासमोर १७ उमेदवार असल्याने दोन इलेक्ट्रॉनिक मतयंत्रावर एकूण १८ उमेदवार व ‘नोटा’ अर्थात नकारार्थी मतदानाची प्रथमच मतदारांना संधी देण्यात आली होती. मात्र, तब्बल १८ उमेदवार असल्याने या नकारार्थी मतदानाचे प्रमाण अत्यल्प राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात काँग्रेस आघाडीच्या डझनभर नेत्यांनी रान उठवले असलेतरी हिंदुत्ववादी कार्यकर्ते व तरुणवर्गाने तोडीस तोड मतदान करीत अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम जाधव यांच्या विजयासाठी प्रयत्नांची शिकस्त केल्याचे चित्र होते. शहरी भागात परिवर्तनाच्या बाजूने मतदान झाल्याची एकच चर्चा पिकली होती. तर, ग्रामीण भागात काँग्रेस आघाडीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांचाच वरचष्मा राहणार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. जास्तीत जास्त मतदान व्हावे म्हणून तरुणांचा पुढाकार राहिला. कराड परिसरात शांतता व सुव्यवस्थेत मतदान झाल्याचे सूत्रांनी सांगितले. तर, ग्रामीण भागातही उत्साही व खेळीमेळीच्या वातावरणात मतदान झाल्याचे पोलीस सूत्रांनी म्हटले आहे. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने निर्भयपणे व खुल्या वातावरणात मतदान होत असताना, उच्चभ्रू मतदारांनी नेहमीप्रमाणे मतदानाकडे पाठच फिरवली. तर, सर्वसामान्यांनी अगदी ज्येष्ठांनाही मतदानांच्या प्रक्रियेत सहभागी केले. अपंग व वृद्ध मतदारांनीही रांगेने जाऊन मतदानाचे कर्तव्य पार पाडले. मात्र, जवळपास निम्मे मतदार मतदान प्रक्रियेपासून दूर राहिल्याने त्याचा नेमका काय परिणाम राहणार याबाबत चर्चा होत असताना, प्रस्थापितांना हा दिलासाच ठरतो आहे, असेही म्हणणे जानकारांनी नोंदवले आहे.