पारनेर तालुक्यातील काताळवेढा येथील तीन चिमुकल्या मुलींचा मृत्यू विषबाधेने नव्हे, तर त्यांच्या निर्दयी आईनेच आपल्या चिमुकल्या मुलींची पाण्यात बुडवून खून केल्याचा क्रूर व धक्कादायक प्रकार पोलीस तपासात पुढे आला आहे. खुनाचे कारण मात्र अद्याप समजले नाही.
स्वत:च्याच तीन मुलींच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी उज्ज्वला ऊर्फ शिल्पा विकास गाजरे हिच्याविरुद्घ खुनाचा गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे. तिला मंगळवारी पारनेर न्यायालयापुढे उभे करण्यात आले असता दि. २७ पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.
तालुक्यातील काताळवेढा या दुर्गम गावात वैष्णवी विलास गाजरे (वय ५), प्रतीक्षा ऊर्फ गुड्डी (वय ३) आणि अनुष्का (वय ३ महिने) या तीन मुलींचा मृत्यू झाला. त्यांची आई उज्ज्वला ऊर्फ शिल्पा हीदेखील अत्यवस्थ झाल्याची घटना दि.२० सप्टेंबर रोजी दुपारी घडली होती. मुलींसह आईला आळेफाटा जिल्हा पुणे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर तिन्ही मुलींचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले, तर आईवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मुलींचा विषबाधा किंवा अन्य कारणामुळे मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. पारनेरचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढोकले यांनी कसून चौकशी केली असता हा धक्कादायक प्रकारावर उजेड पडला.
मुलींच्या हत्येप्रकरणी मुलींची आजी तान्हाबाई कृष्णाजी गाजरे (रा. गाजरेवाडी, काताळवेढा) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की मुलींची आई उज्ज्वला ऊर्फ शिल्पा विकास गाजरे हिने दि. २० सप्टेंबरला दुपारी घराजवळच्या विहिरीतील पाण्यात बुडवून तिन्ही मुलींचा खून केला. दरम्यान, उज्ज्वला हीस अटक केल्यानंतर मंगळवारी दिवसभर तिचा पती, वडील तसेच काही नातेवाईक पोलीस ठाण्याच्या आवारात होते. त्यांनी मुलींचा मृत्यू पाण्यात पडून बुडाल्यामुळे झाला हे मान्य केले, मात्र त्यांना उज्ज्वला हिने मारले नाही असे सांगितले.
पारनेरचे निरीक्षक ढोकले यांनी सोमवारी सकाळीच काताळवेढा येथे जाऊन तपास केला. मुलींची आजी तान्हाबाई यांनी मुली दारात अत्यवस्थ अवस्थेत आणण्यात आल्या त्या वेळी त्यांचे कपडे भिजलेले होते अशी माहिती दिली. तेथूनच तपासाला सुरुवात झाली. आळेफाटा येथील रुग्णालयात जाऊन डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतर मुलींचा मृत्यू तेथे दाखल होण्यापूर्वीच झाल्याचे सांगण्यात आले. उपचार घेत असलेल्या उज्ज्वला हीस रुग्णालयात ठेवण्याची गरजच नसल्याचेही त्यांच्या निदर्शनास आले. मुलींचे शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांशी संपर्क केल्यानंतर मुलींच्या पोटात पाणी आढळून आल्याचे सांगण्यात आले. सर्व बाजू तपासल्यानंतर ढोकले यांनी रुग्णालयातून उज्ज्वला हीस ताब्यात घेतले.

आजारपणाचे नाटक
उज्ज्वला हिने मुलींना का मारले, याविषयी तिने अजूनही मौन बाळगले आहे. मुलींची निर्दयीपणे हत्या केल्यानंतर अत्यवस्थ झाल्याचे नाटक करून आळेफाटा येथील रुग्णालयात ती आयसीयूमध्ये दाखल झाली होती, पण वैद्यकीय अधिकाऱ्यांनी हिला काही झाले नसल्याचे सांगितल्यावर पारनेर पोलिसांनी तिला ताब्यात घेतले.