|| गीता कुळकर्णी

आईविना पोरके झालेले माकडाचे पिल्लू आता ठणठणीत

ठाणे : उंच झाडावरून खाली कोसळल्याने मृत्यूमुखी पडलेल्या माकडाच्या मादीचे अवघ्या दोन दिवसांचे पिल्लू अनाथ तर झालेच; पण आईचे दूध न मिळाल्याने या पिल्लाच्या जिवाला धोकाही वाढला होता. मात्र, या मादी पिल्लाचा वाइल्डलाइफ वेल्फेअर असोसिएशनच्या मानसी नथवाणी यांनी व्यवस्थित सांभाळ केल्याने हे पिल्लू आता ठणठणीत झाले आहे. तिचे ‘लक्ष्मी’ असे नाव ठेवण्यात आले असून लक्ष्मी आता नथवाणी यांच्या घरात खेळू-बागडू लागली आहे.

येऊर येथील रवी इस्टेट भागात २ फेब्रुवारीला माकडीण आणि तिचे पिल्लू २० फूट उंचीवरुन पडले होते. या घटनेत दुर्दैवाने माकडीणीचा मृत्यू झाला होता. तर, आईला घट्ट बिलगून राहिलेले पिल्लू मात्र बचावले. परंतु, अवघ्या दोन दिवसांच्या या पिल्लाला आईचे दूध आणि ऊब न मिळाल्याने त्याची प्रकृती खालावली होती. ‘वाइल्डलाइफ वेल्फेअर असोसिएशन’च्या मानसी नाथवाणी यांनी या पिल्लाचा सांभाळ करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला काही दिवस तर त्या या पिल्लाला चोवीस तास आपल्या कुशीत घेऊन रहात होत्या. प्राण्यांच्या दवाखान्यात जाऊन ‘इंफ्रारेड लाईट’ या उपकरणाचा वापर करून या पिल्लाला कृत्रिम ऊबही देण्यात आली. त्यानंतर तिची प्रकृती सुधारली. पिल्लू पाच दिवसांचे झाल्यानंतर तिचे ‘लक्ष्मी’ असे नाव ठेवण्यात आले.  लक्ष्मीला आईचे दूध मिळाले नसले तरी बाहेरील दुधावर तिचे व्यवस्थित पोषण सुरू आहे. सध्या तिची प्रकृती स्थिर असून आता ती तोंडाने आवाजही काढू लागली आहे. एवढेच नव्हे तर, आता नाथवाण्ोी यांच्या घरात ती खेळू-बागडूही लागली आहे. ती दिवसातून ८ वेळा ५० मि.ली. लिटर दुध पित असल्याचे मानसी यांनी सांगितले. ती बाटली हातात धरून मजेत दूधप्राशनाचा आनंद घेते, असेही त्या म्हणाल्या.

लक्ष्मीची प्रकृती स्थिरावत चालली आहे. ज्या दिवशी तिचा सांभाळ करण्यासाठी घरी आणला त्यादिवशी तिची काहीच हालचाल नव्हती, परंतू आता ती पाऊल टाकण्याचा प्रयत्न करत आहे. तिची पचनक्रिया देखील सुधारली आहे. – मानसी नथवाणी, ठाणे</strong>