पुणतांबे रस्त्यावर निमगावखैरीनजीक मालमोटार व मोटारसायकलची धडक होऊन झालेल्या अपघातात एक जण ठार तर एक गंभीर जखमी झाला. अपघातानंतर लागलेल्या आगीत मालमोटार जळून खाक झाली.
पुणतांबे रस्त्यावर खैरीनिमगावहून शहराकडे येणारी बटाटय़ाने भरलेली मालमोटार (क्रमांक आरजे ११- जीए ६१४१) आणि शहराकडून पुणतांब्याकडे निघालेली मोटारसायकल (क्रमांक एमएच ४१ एडी ८०४७) यांच्यात तीनचारी जवळील अपघाती वळणावर भीषण अपघात झाला. मोटारसायकलस्वार संदीप रमेश गडाख (वय ३०, रा. मांडवण, ता. नांदगाव, जि. नाशिक) हा मृत झाला. तर सुधीर माधवराव काजळे (वय ३०) हा गंभीर जखमी झाला. त्यांना येथील साखर कामगार रुग्णालयात दाखल असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गडाख यांस मृत घोषित केले, तर काजळे याच्या पायाचे हाड मोडले असून, त्यास लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
हा अपघात इतका भयानक होता की घटना घडल्यानंतर मोठा आवाज झाला. मोटारसायकल सुमारे तीनशे फुटापर्यंत ट्रकच्या मागच्या चाकात गुंतल्याने फरपटत गेली, तर मोटारसायकलवरील दोघे बाजूला फेकले गेले. मोटारसायकल फरपटत गेल्याने टायर आणि मोटारसायकलच्या घर्षणाने अनेक ठिणग्या उडून मालमोटारीने पेट घेतला. नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. तसेच जखमींना रुग्णवाहिकेने रुग्णालयात दाखल केले. मालमोटार बटाटय़ाने भरलेली असल्याने संपूर्ण रस्त्यावर बटाटे होते. मालमोटारीला लागलेली आग इतकी भीषण होती की जवळपासची झाडे या आगीत होरपळली. तर मालमोटार जळून खाक झाली.
या अपघातातील मृत संदीप गडाख आणि जखमी सुधीर काजळे हे आपल्या येथील नातेवाइकांकडे काल मुक्कामास थांबले होते आणि उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून पहाटेच्या वेळी भरधाव वेगात घराकडे जात असताना दुर्दैवाने हा अपघात घडला. मृत संदीप हा होतकरू तरुण असून कुटुंबातील कर्ता व्यक्ती होता. त्याच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दु:खाचे  सावट पसरले आहे. जखमी सुधीर काजळे हा अपघातस्थळावर उपस्थित असलेल्यांना मदतीची याचना करत असताना त्या वेळी खैरीनिमगाव येथील काही जागरूक नागरिकांनी पोलीस स्टेशन व अग्निशमन दलास माहिती दिली व मदतकार्य केले. बटाटय़ाने भरलेला ट्रक कुठून आला आणि कुठे चालला होता याबाबत काहीही माहिती उपलब्ध झाली नाही. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात साखर कामगार रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.