(फोटो ११मोसंबी, मोसंबी२)
औरंगाबाद जिल्हय़ातील मोसंबीच्या बागांवर बुरशीजन्य रोगांचा हल्ला झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. सततचा दुष्काळ व या वर्षी पावसाने ताण दिल्यामुळे आधीच संकटात सापडलेल्या फळबाग उत्पादकांना फटका बसला. ‘फायटोथोरा’ असे या बुरशीजन्य रोगाचे नाव असून बुरशीमुळे ५० टक्क्यांहून अधिक फळ गळून पडत आहे.
सध्या मोसंबीचा आंबे बहार सुरू आहे. या काळात बुरशीजन्य आजार जडल्याने फळ झाडावर टिकत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. या रोगावर तातडीने उपाय सुचवावा व मोसंबी उत्पादकांचे नुकसान टाळावे, यासाठी कृषी विभागाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी केली जात आहे. औरंगाबाद व जालना जिल्हय़ांत मोसंबीचे क्षेत्र अधिक आहे. आधी दुष्काळात व नंतर गारपिटीमध्ये भरडले गेलेल्या शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. काहींना तर १०० रुपयांच्या आतच मदतीचे धनादेश दिले गेले. फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी ७५ हजार रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी मोसंबी उत्पादक शेतकरी संघाचे अध्यक्ष जयाजी सूर्यवंशी यांनी केली. ही बुरशी थांबविण्यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना अजूनही मार्गदर्शन केले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांत तीव्र नाराजी आहे. मराठवाडय़ाप्रमाणेच विदर्भातील संत्र्यावरही याच बुरशीचा हल्ला झाला. मोठय़ा कष्टाने मोसंबीची बाग जपणाऱ्या शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा आहे, असे सूर्यवंशी यांनी सांगितले.