भाईंइर : शहीद झालेले मेजर कौस्तुभ राणे मीरा रोड येथील शीतल नगर भागात राहाणारे. मंगळवारी सकाळी ते दहशतवाद्यांशी लढताना शहीद झाल्याची बातमी धडकली आणि शीतलनगर भागात एकच शोककळा पसरली.

कौस्तुभ राणे यांना नियंत्रण रेषेवर केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते सेना  शौर्यपदकाचा बहुमान मिळाला होता आणि मेजर या हुद्दय़ावर त्यांना बढतीही मिळाली होती. त्यामुळे त्यांच्याविषयी रहिवाशांच्या मनात प्रचंड अभिमान होता. मात्र त्यांच्या बलिदानानंतर मीरा रोडचा सुपुत्र गेल्याचे दु:ख मंगळवारी या परिसरावर दाटले होते.

मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातल्या वैभववाडी येथील सडुरे गावचे राणे कुटुंब १९९० मध्ये मीरा रोडच्या शीतलनगर येथील हिरल सागर या इमारतीत रहायला आले. कौस्तुभचे शालेय शिक्षण मीरा रोडच्या होली क्रॉस शाळेत झाले. लहानपणापासूनच अतिशय हुशार असलेल्या कौस्तुभने शालेय जीवनातच सैन्यात जायचे नक्की केले होते. लष्करी शिक्षण पुण्यात पूर्ण केल्यानंतर २०१० मध्ये त्यांनी कम्बाईन डिफेन्स सर्विस परिक्षा उत्तीर्ण केली आणि चेन्नई येथे अधिकारी प्रशिक्षण पूर्ण केले. ऑक्टोबर २०११ मध्ये लेफ्टनंट या पदावर ते लष्करी सेवेत रुजु झाले. २०१३ मध्ये त्यांना कॅप्टन पदावर बढती मिळाली आणि २०१८ मध्ये मेजर पदावर कार्यरत झाले.

सध्या ते सीमेवर ३६ वी बटालीयन दि राष्ट्रीय रायफल्स मध्ये कार्यरत होते. कौस्तुभ राणे यांच्या पश्चात त्यांची पत्नी कनिका, वडील प्रकाश, आई ज्योती, बहिण काश्यपी असे कुटुंब असून त्यांना दोन वर्षांचा लहान मुलगा आहे.

कौस्तुभचे वडील खासगी कंपनीत नोकरीला होते, सध्या ते निवृत्त झाले आहेत.  त्यांची आई  निवृत्त शिक्षिका आहेत.  काश्मीरमध्ये बदली होण्याआधी ते कोलकाता येथे आपल्या पत्नीसह रहात होते. मात्र काश्मीरमध्ये नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी आपली पत्नी आणि मुलाला आई वडिलांकडे मीरारोडला रहायला पाठवले होते. एप्रिल महिन्यातच ते कुटुंबाच्या भेटीसाठी येऊन गेले होते.

राणे कुटुंब शीतल नगरच्या ज्या भागात राहतात त्याठिकाणी मूळच्या कोकणवासीयांची संख्या मोठी आहे. ही सर्व कुटुंब सिंधुदुर्ग मराठा मंडळाच्या माध्यमातून एकमेकांशी जोडली गेली आहेत. लष्करी प्रशिक्षण काळातही कौस्तुभ व्यस्त असताना जेव्हा कधी घरी येत असे तेव्हा मंडळाच्या कार्यक्रमांना आवर्जुन उपस्थिती दर्शवित असे अशी माहिती मंडळाचे संस्थापक राजेश परब यांनी दिली.

कौस्तुभने देशासाठी बलिदान दिले असल्याने त्यांच्याबद्दल सार्थ अभिमान वाटत असला तरी कोकणचा आणि मीरा रोडचा सुपुत्र गेल्याने आमच्याच कुटुंबातील एक सदस्य गेला असल्याचे दु:ख ही मोठे आहे, अशी भावना येथील रहिवाशांनी व्यक्त केली.  कौस्तुभ राणे यांचे पार्थिव बुधवारी सायंकाळी किंवा गुरुवापर्यंत मीरा रोडला येण्याची शक्यता आहे.