परभणी : गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळापासून दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनाला जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा जाहीर पाठिंबा दर्शवण्यासाठी शनिवारी गंगाखेड रस्त्यावरील पोखर्णी फाटा येथे परभणी येथील सुकाणू समितीचे निमंत्रक कॉ. विलास बाबर यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द करावेत, अशी मागणी करीत केंद्र सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

या आंदोलनात बाबर यांच्यासह बंडू पाटील, गोविंद भांड, वसंतराव पवार, विकास दळवे यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते. शेतकरी शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असताना  सरकार त्यांच्याशी संवाद साधण्याचे सौजन्यही दाखवत नाही. उलट सत्तेच्या बळावर आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोपही करण्यात आला. शेतकऱ्यांना रोखण्यासाठी काटेरी तारांची कुंपणे लावणे, खंदक खोदणे, खिळे बसवणे हे हुकूमशाहीचे प्रकार असून शेतकरी कदापिही  ते खपवून घेणार नाहीत, असा इशाराही या वेळी कॉ. विलास बाबर यांनी दिला. या आंदोलनामुळे बराच काळ वाहतूक ठप्प होती. पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता.

‘स्वाभिमानी’चा  रास्ता रोको

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष किशोर ढगे यांच्या नेतृत्वाखाली परभणीत शनिवारी आंदोलन करण्यात आले. दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या चक्का जाम आंदोलनाला पाठिंबा म्हणून शहरातील गंगाखेड रोडवरील पिंगळगड परिसरात रास्तारोको करण्यात आला. या वेळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. या आंदोलनात भास्कर खटींग, गजानन तुरे, शेख जाफर यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते. शेतकरी विरोधी कायदे रद्द करावेत. राज्यातील साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी द्यावी, टाळेबंदीमुळे पालकांचे आर्थिक बजेट कोलमडलेले असल्याने शाळांनी केवळ २५ टक्केच फी आकारावी, अशी मागणीही करण्यात आली.