जल, जंगल, जमीन आमचे आहेत.. मावा नाटे-नाटे सरकार.. ना लोकसभा ना विधानसभा सबसे बडी ग्रामसभा.. जान देंगे, पहाड नही देंगे.. जयसेवा, जय जोहर, जयभीम, इन्कलाब जिंदाबाद, लाल सलाम जिंदाबाद, लॉयड मेटल्स मुर्दाबाद.. पोलिसांच्या दडपशाहीचा निषेथ असो, अशा निषेधाच्या निनादात सुरजागड लोह प्रकल्पाविरोधात शुक्रवारी विद्रोहाचा शंखनाद करण्यात आला. येथून हेडरी पोलिस ठाणे अवघ्या ५-६ कि.मी.वर आहे, परंतु पोलीस यात्रेपासून दूर होते. या मार्गावरील प्रत्येक वाहनाची ते चौकशी करत होते.

गुरुवारपासून सूरजागड पहाडावर सुरू झालेल्या आदिवासींचे श्रध्दास्थान ठाकूरदेव यात्रेनिमित्ताने या परिसरातील ७० गावातील हजारो आदिवासी आलेले आहेत. एटापल्लीपासून २२ कि.मी.वर सूरजागड हे छोटसे पहाडी गाव. गेल्या वर्षी यात्रेला गावकऱ्यांचा फारसा प्रतिसाद नव्हता. मात्र, यंदा बरीच गर्दी आहे. कारण, लॉयड मेटल्सने या पहाडीवर सुरू केलेल्या उत्खननाला या गावकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. यासाठीच ते यात्रेनिमित्ताने एकत्र आले. सलग तीन दिवसांची ही यात्रा यंदा मात्र प्रथमच चार दिवस चालणार आहे. या यात्रेला भेट दिली असता लॉयड मेटल्सचे उत्खनन, सूरजागड प्रकल्पाचा विरोध आणि राज्य व केंद्र शासनाच्या निधीच्या विरोधातील तीव्र भावना येथे बघायला मिळाल्या. सूरजागड व तोडसा पारंपरिक इलाका गोटूल समितीच्या वतीने ‘सूरजागड वार्षिक महोत्सव व अधिकार संमेलन’ येथे आयोजिलेले होते. सूरजागड इलाका भूमिया करपा हिचामी व इलाका सेहनाल सैनू गोटा यांच्या हस्ते निसर्ग देवदेवतांची पूजा व गोंडी धर्मध्वज फडकावून महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर ‘संस्कृतीच्या रक्षण व जतनासाठी ग्रामसभांची भूमिका’ या विषयावर चर्चासत्र झाले. यावेळी कोरची परिसरातून रामसुराम काटेंगे, सियाराम हलामी, खुटगावातून हरिदास पदा, प्रल्हाद पोरेट्टी, झाडापापडातून बासू पावे, वसंत पोटावी, तोडसा इलाका प्रतिनिधी कारू रापंजी, रामजी गुम्मा, तर मुच्ची दुर्गा, आऊ, लालसू नरोटे हे पारंपरिक इलाक्यांचे प्रतिनिधी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी त्यांनी भारतीय संविधानातील तरतुदी व पेसा कायद्यान्वये अनुसूचित क्षेत्रातील ग्रामसभा आपल्या संस्कृतीच्या रक्षणास सक्षम आहे, याकडे लक्ष वेधले.

रात्रीच्या सत्रात जिल्हाभरातील ग्रामसभांच्या वतीने रेला गीते व नृत्य सादर करण्यात आली. उडेरा ग्रामसभेच्या वयोवृध्द महिलांनी या माध्यमातून लॉयड मेटल्सच्या उत्खननामुळे होणारा विनाश मांडून अंतर्मुख केले. संस्कृती आणि रोजगाराच्या रक्षणाकरिता मंजूर व प्रस्तावित खाण रद्द करा, या सूरजागड इलाक्यातील ७० ग्रामसभांनी यापूर्वीच घेतलेल्या भूमिकेबद्दल या ग्रामसभांच्या प्रतिनिधींनी खाणविरोधी कारण विषद केले. याच्या समर्थनार्थ पक्ष व संघटनांच्या प्रतिनिधींनी भूमिका मांडली व तसे शपथपत्र दिलेले कॉंग्रेसचे संजय वरडूके, भाकपचे जिल्हा सचिव डॉ. महेश कोपूलवार, राष्ट्रवादीचे दौलत दहागावकर, आदिवासी विद्यार्थी संघटनेचे नंदू मट्टामी, विस्थापनविरोधी जनविकास आंदोलनाचे केंद्रीय संयोजक समिती सदस्य महेश राऊत, महाराष्ट्र ग्रामविकास जनांदोलनाच्या उपाध्यक्ष जयश्री वेळदा यांनीही मते व्यक्त करून या प्रकल्पाला तीव्र विरोध केला. आदिवासी संस्कृती व जल-जंगल-जमीन व शाश्वत रोजगार गक्षणासाठी जिल्ह्य़ातील सर्व खाणी रद्द करण्याची एकमुखी मागणी करून जनतेचा जाहीरनामा जाहीर करण्यात आला. यावेळी सर्वानी हात वर करून लाल सलाम जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद, लॉयड मेटल्स मुर्दाबाद, पोलिसांच्या दडपशाहीचा निषेध असो, अशा जोरदार घोषणा दिल्या. या कार्यक्रमाचे संचालन रामदास जराते व आभार सैनु गोटा यांनी मानले. महेश राऊतही समर्थनार्थ बोलले. या महोत्सवात छत्तीसगड, तेलंगणा, आंध्रप्रदेशासह महाराष्ट्रातील पुणे व मुंबईहूनही बरेच स्वयंसेवी कार्यकर्ते आले होते.

.. आणि माजी मंत्री निघून गेले

या अधिकार संमेलनात तीव्र घोषणाबाजी सुरू असतांनाच राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम ठाकूरदेवाच्या दर्शनार्थ पोहोचल्याचे समजताच काही कार्यकर्त्यांनी घोषणा अधिकच तीव्र केल्या. अशा प्रकल्पांना मंजुरी देण्यासाठी सक्रीय दलालांचा मुर्दाबाद, अशाही घोषणा यावेळी दिल्या. त्या कानी पडताच धर्मरावबाबा दर्शन घेऊन परस्पर निघून गेले.

साईनाथची यात्रेत हजेरी?

सूरजागड येथे ८० वाहनांच्या जाळपोळीचा मुख्य सूत्रधार जहाल नक्षलवादी कमांडर साईनाथ याने यात्रेत हजेरी लावल्याची माहिती यात्रेतील काहींनी दिली. फेरफटका मारतांना काहींच्या दृष्टीलाही साईनाथ पडला, पण अतिशय चपळाईने तो जंगलात निघून गेल्याचेही सूत्रांनी सांगितले. त्याची ही हजेरी माध्यम प्रतिनिधींसाठी धक्कादायक होती. दरम्यान, विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींनी दोन दिवसांपूर्वीच कडक पोलिस बंदोबस्तात ८० वाहनांचे सर्वेक्षण केले.