महापौर तथा आमदार संग्राम जगताप यांनी महापौरपद सोडण्याची तयारी दर्शवल्यानंतरच राष्ट्रवादीत बदलाच्या हालचाली सुरू झाल्या असल्या तरी नव्या निवडीसाठी राष्ट्रवादीला मोठीच कसरत करावी लागणार आहे. सत्ताधारी आघाडीतील काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना व अन्य अपक्षांनाही पुन्हा सामावून घ्यावे लागणार असून, याच पार्श्र्वभूमीवर या हालचालींबाबत उत्सुकता व्यक्त होते.
विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर लगेचच राष्ट्रवादीत महापौर बदलाच्या हालचाली सुरू झाल्या होत्या, मात्र संग्राम जगताप यांनी त्याला तयारी दर्शवल्यानंतरच या हालचालींना वेग आल्याचे खात्रीलायक रीत्या समजते. तसा होकारही त्यांनी पक्षश्रेष्ठींना पूर्वीच कळवला होता. त्यानंतरच मंगळवारी मुबंईत बैठक बोलावून याबाबतचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार आता पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित पवार हेच जगताप यांना राजीनाम्याबाबतचा आदेश देतील. पुढच्या निवडीची मोर्चेबांधणी झाली हे लक्षात आले, की हा निर्णय होईल, असे समजते. पुढच्या निवडीतही जगताप पितापुत्रांना महत्त्वाची भूमिका बजवावी लागणार असून, ही बांधण्याची जबाबदारी त्यांच्यावरच टाकण्यात येणार असल्याचे समजते.
नव्या महापौरपदासाठी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष दादा कळमकर यांचे पुतणे अभिषेक कळमकर यांचे नाव आघाडीवर आहे. कमालीची गोपनीयता पाळून मंगळवारी मुंबईत याबाबत बैठक बोलावण्यात आली होती. आठ दिवसांपूर्वीच ती ठरली होती. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली. नगरहून मोजकेच पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
संग्राम जगताप हे विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर महापौर व आमदार अशी दोनही पदे त्यांच्याकडेच आहेत. विधानसभेच्या निवडणुकीनंतर लगेचच यातील एक म्हणजेच महापौरपद त्यांनी सोडावे, अशा हालचाली पक्षात सुरू होत्या. मात्र जगताप यांनी सुरुवातीला हा विषय लांबणीवर टाकण्यात यश मिळवले होते. महापौरपदाचाही कार्यकाळ ते पूर्ण करतील, अशी चर्चा सुरू असतानाच पक्षात या बदलाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.