News Flash

शेतकऱ्यांना सावरण्यासाठी झेंडू खरेदीची चळवळ

यंदा दसऱ्याला झेंडूच्या फुलांना मातीमोल भाव आल्याने ती रस्त्यावर फेकून द्यावी लागली.

(संग्रहित छायाचित्र)

आसाराम लोमटे

कल्पक शिक्षकाच्या आवाहनातून प्रदूषणमुक्त दिवाळीचा संकल्प

यंदा दसऱ्याला झेंडूच्या फुलांना मातीमोल भाव आल्याने ती रस्त्यावर फेकून द्यावी लागली. ज्या शाळकरी विद्यार्थ्यांनी शाळा बुडवून आपल्या कुटुंबाला ही फुले तोडण्यात मदत केली अशा मुलांचे चेहरे दसऱ्यानंतर शाळेत आल्यावर त्या फुलांसारखेच कोमेजून गेले. एका संवेदनशील शिक्षकाला या घटनेने अस्वस्थ केले आणि त्यातूनच आकाराला आली एक चळवळ. जोडीला समाजमाध्यमांचा वापर करीत त्या चळवळीने आता व्यापक रूप धारण केले आहे.

ही दिवाळी प्रदूषणमुक्त वातावरणात साजरी करण्यासाठी फटाक्यांवरचा खर्च टाळायचा आणि त्यातल्या निम्म्याच खर्चाची झेंडूची फुले ५० रुपये प्रतिकिलोने विकत घेऊन दिवाळीत घर सजवायचे, अशी ही चळवळ आहे. पाहता-पाहता झेंडूच्या फुलांची ही चळवळ पार मराठवाडा ओलांडून पुणे-नाशिकपर्यंत जाऊन पोहोचली.

अण्णासाहेब संजाबराव जगताप (पुंगळा, जि. परभणी) या शिक्षकाने ही झेंडूच्या फुलांची चळवळ सुरूकेली. सुरुवातीला ‘झेंडूची फुले’ या नावाचा एक ‘व्हॉट्सअ‍ॅप’ गट तयार केला. आता याच नावाने आणि त्यापुढे आपल्या गावाचे नाव जोडून किमान ३०-४० गट तयार झाले आहेत. दिवाळीच्या फटाक्यांवर  साधारणत: एक हजार रुपये खर्च होतो. तो टाळायचा, प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करायची. झेंडूच्या फुलांनी आपले घर सजवायचे. त्यातून शेतकऱ्यांनाही मदत होईल, हे जगताप  यांना उमगले. त्यांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ दिली. मुलांनीही आम्ही फटाके वाजवणार नाही, झेंडूच्या फुलांनी घर सजवू, अशी शपथ घेतली. आता गावोगाव अशा शपथा घेतल्या जात आहेत. फटाक्यांवर खर्च करण्याऐवजी फुलांनी घर सजवायचे आणि पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करायची, असा निर्धार अनेक गावांमधून उमटला. सध्या ‘झेंडूची फुले’ या नावाने अनेक ‘व्हॉट्सअ‍ॅप’ गट तयार झाले आहेत. त्याद्वारे ग्राहक आणि शेतकरी जोडले जात आहेत.

सुरुवातीला जगताप यांनी समाजमाध्यमांवर ‘झेंडूची फुले..’ शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या पोरांनो वाचा, असे लिहून आवाहन केले. उन्हाळी नांगरणी-कोळपणी, बियाणे, रोपे तयार करणे, लागवड, खत, निदण, फवारणी, तोडणी, वाहतूक खर्च असे सर्व मिळून झेंडूचा एकरी एक लाखापर्यंत खर्च जातो. एवढे करूनही पदरी निराशा येते. त्यातूनच शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी आतषबाजीऐवजी फुलांची सजावट अशी संकल्पना त्यांनी रुजवायचा प्रयत्न केला आणि आता गावोगावी ती रुजू लागली आहे. अनेक ग्राहक झेंडू फुलांच्या या समाजमाध्यमांवरील गटात फुलांची मागणी नोंदवत आहेत. वसमत येथे पोलीस उपनिरीक्षक रुपाली कांबळे यांनी आपल्या कॉलनीत महिलांची बैठक घेतली आणि ५० रुपये प्रतिकिलोप्रमाणे झेंडूची फुले खरेदी करू, असे या बठकीत एकमताने ठरवले. अनेक गावांमध्ये शाळेतील शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांच्या शेतातील झेंडूची फुले खरेदी करून दिवाळीत घर सजवायचे असे ठरवले आणि त्यांनी आपली मागणीही नोंदवली. मुख्याध्यापक जनार्दन देशमुख यांनी आवाहन वाचून आपल्या शाळेत विद्यार्थ्यांना विचारले, कोणाच्या शेतात झेंडूची फुले आहेत? शाळेत चार मुले निघाली. सर्व शिक्षकांनी ५० रुपये दराने ४० किलो झेंडूची मागणी नोंदवली आणि दोन हजार रुपये अग्रिमही दिले.

ग्राहक निर्माण करणे हे ध्येय

‘‘शेतकऱ्याच्या उत्पादनाची किंमत करणारा ग्राहक निर्माण झाला तर आजचे शेतीचे प्रश्न सुटतील. उत्पादक तर या चळवळीशी जोडले जात आहेतच, पण ग्राहक निर्माण करणे आणि या ग्राहकाने थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करणे हे या चळवळीचे ध्येय आहे. आज झेंडूच्या फुलांपासून सुरू झालेली ही चळवळ उद्या अन्य शेतमाल उत्पादनांबाबतही राबवली जाऊ शकते.’’

– अण्णासाहेब जगताप

झाले काय?

मराठवाडा आणि मराठवाडय़ाबाहेरही झेंडूच्या फुलांची शेती फुललेली आहे. दसरा-दिवाळीत या फुलांची विक्री मोठय़ा प्रमाणावर होते. या वर्षी दसऱ्याला काही ठिकाणी झेंडू रस्त्यावर फेकून द्यावा लागला. सध्याच्या भीषण परिस्थितीत झेंडू उत्पादक शेतकऱ्यांना सावरायचे असेल तर प्रत्यक्ष कृतीशिवाय पर्याय नाही, असे शिक्षक असलेल्या अण्णासाहेब जगताप यांना वाटले. त्यांनी समाजमाध्यमावरून याबाबत साद घातली आणि त्याचे चळवळीत रूपांतर झाले. पुणे-नाशिकपर्यंत ती पसरली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 1, 2018 3:03 am

Web Title: movement of marigold for farmers
Next Stories
1 ऐन दिवाळीत धान्य बाजारपेठेवर दुष्काळाची पडछाया
2 अनिल गोटे यांचे भाजपवरच दबावतंत्र?
3 १५ हजार विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात
Just Now!
X